Strait of Hormuz shipping crisis updates and Iran’s official statement on India safety : अमेरिका-इस्रायल यांनी केलेल्या हल्ल्यानंतर इराणने जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला समुद्री मार्ग रोखून धरला आहे. यानंतर मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्ष सध्या शिगेला पोहोचला असून याची झळ जगभरातील देशांना बसत आहे. यादरम्यान इराणने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टच्या माध्यमातून एक खास संदेश जारी करत होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत भारताला आश्वस्त केले आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ‘इराण इन इंडिया’ या हँडलने एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, “आमचे भारतीय मित्र हे सुरक्षित हातात आहेत, काळजी नसावी.” असाच एक संदेश सौदी अरेबियातील इराणच्या दूतावासाने देखील शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “होर्मुझच्या सामुद्रधुनीचे भविष्य फक्त इराण आणि ओमान ठरवतील.” तसेच या पोस्टमध्ये, “तुम्ही सुरक्षित हातात आहात, काळजी नसावी,” असेही म्हटले आहे.

भारत विश्वासू भागीदार

इराणचे भारतातील राजदूत मोहम्मद फथाली यांनी नुकतेच केलेल्या एका महत्त्वाच्या वक्तव्यानंतर पार्श्वभूमीवर ही पोस्ट करण्यात आली आहे. पश्चिम आशियामध्ये संघर्ष सुरू असला तरी इराण भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देईल, असे फथाली म्हणाले होते. नवी दिल्ली येथे बोलताना फथाली यांनी भारताचा उल्लेख हा इराणचा एक ‘विश्वासू भागीदार’ म्हणून केला होता. तसेच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करताना भारतीय जहाजांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील एक प्रमुख वाहतूक मार्ग असून, एकूण जगातिल तेल पुरवठ्यापैकी एक मोठा हिस्सा याच मार्गावरून जातो.

इराणकडून होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत वारंवार आश्वस्त केले जात असले तरी जमिनीवरील परिस्थिती गुंतागुंतीची बनली आहे. इराणच्या अधिकार्‍यांनी अद्याप ही सामुद्रधुनी अधिकृतपणे बंद केली नसल्याचे म्हटले आहे, तरीही सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे या मार्गावरून व्यावसायिक जहाजांच्या वाहतुकीत अनेक आव्हाने निर्माण झाल्याचे त्यांनी मान्य केले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून सध्या काही प्रमाणात वाहतूक सुरू असली तरी सध्याच्या परिस्थितीमुळे जहाजांना या मार्गावरून प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे, अशी माहिती इराणच्या सर्वोच्च नेत्याचे भारतातील प्रतिनिधी अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी दिली.

दरम्यान या सागरी मार्गावर काही जहाजांवर हल्ला झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर चिंता वाढल्या आहेत. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, संघर्ष सुरू झाल्यापासून आखाती समुद्रात अनेक जहाजांवर हल्ले झाले आहेत, ज्यामध्ये स्फोटकांनी भरलेल्या बोटींनी तेलाच्या टँकर्सना लक्ष्य केल्याच्या घटनांचाही समावेश आहे.

भारतासाठी हा जलमार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण भारत आपल्या ऊर्जेच्या आयातीसाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.

इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून ज्या पाच मित्र देशांच्या जहाजांच्या वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे, त्यामध्ये भारताचाही समावेश आहे. भारताबरोबर यामध्ये चीन, रशिया, इराक आणि पाकिस्तान हे देश देखील आहेत.