दुबई, तेल अविव, बेरुत : इस्रायलने इराणच्या आणखी एका उच्च स्तरावरील सुरक्षा अधिकाऱ्याला मारल्याचा दावा केला आहे. उच्च अधिकाऱ्यांच्या मृत्युमुखी पडल्याचा परिणाम इराणच्या प्रतिहल्ल्यांवर होणार नाही, असे इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले आहे. दरम्यान, इस्रायलने बुधवारी लेबॉननची राजधानी बेरुतला पुन्हा लक्ष्य केले. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात काही इमारती उद्ध्वस्त झाल्या.
इराणने आखाती देशांवर बुधवारीही हल्ले सुरू ठेवले आहेत. इराणमधील वरिष्ठ स्तरावरील सुरक्षा अधिकारी अली लारिजानी यांचा इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी इस्रायलने इराणचे गुप्तचर खात्याचे मंत्री इस्माइल खातिब यांना मारल्याचा दावा केला आहे. काही तासांनी इराणच्या सराकरी वाहिनीने खातिब यांच्या मृत्यूच्या दाव्याला दुजोरा दिला. त्याशिवाय इराणने लारिजानी यांच्या मृत्यूच्या वृत्तालागी पुष्टी दिली असून, इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा सुरू ठेवला आहे. या माऱ्यात तेल अविवमधील दोन जणांचा मृत्यू झाल्याचे इस्रायलने म्हटले आहे.
अमेरिका-इस्रायल आणि इराणविरोधातील युद्ध तिसऱ्या आठवड्यातही सुरू असून, तणाव निवळण्याची कुठलीही शक्यता दृष्टिपथात नाही. तेलपुरवठा विस्कळित झाल्याचा परिणाम तेलाच्या किमतींवर होत असून, २०२२ नंतर प्रथमच अमेरिकेत डिझेलच्या किमती प्रतिगॅलन पाच डॉलरच्या पुढे गेल्या. अमेरिकेतील खतांच्या किमतीही वाढल्या असून, एका व्यापाऱ्याने किमतींमध्ये ४० टक्के वाढ झाल्याचे सांगितले.
इस्रायलने मध्य बेरुतमधील इमारतींना लक्ष्य केले. हल्ला करण्यापूर्वी इमारती मोकळ्या करण्याचे इशारे दिले गेले. त्यानंतर इस्रायलने केलेल्या इमारतींचा अक्षरशः पालापाचोळा झाला. या ठिकाणी कुठलेही लष्करी ठिकाण नाही. केवळ नागरिकांमध्ये दहशत बसावी, यासाठी केलेला हा हल्ला होता, असा आरोप स्थानिकांनी केला. या हल्ल्यात १० जणांचा मृत्यू झाला.
युद्धकाळात इराणची १.६ कोटी बॅरल तेलनिर्यात
युद्धाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत तेलवाहतूक करणाऱ्या ९० नौका, टँकर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितरीत्या इच्छितस्थळी गेले आहेत. इराणने १.६ कोटी बॅरलची निर्यात युद्धकाळात केली आहे. सागरी व्यापाराची नोंद ठेवणाऱ्या ‘केपलर’ संस्थेने हा अंदाज व्यक्त केला आहे. भारत आणि पाकिस्तानकडे तेल घेऊन येणाऱ्या नौकाही होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे आल्या आहेत. भारताच्या आणखी नौका या ठिकाणी अडकून पडल्या आहेत.
अन्य घडामोडी
- इस्रायलचे लेबनॉनमधील हेजबोला गटावर हल्ले. १० जणांचा मृत्यू.
- इराणच्या दक्षिणेकडे न्यायिक विभागावर हल्ला. कर्मचारी आणि नागरिक जखमी.
- इराणचे कतार, यूएई, सौदी अरेबिया, बहारीनवर हल्ले.
- अमेरिकेत राष्ट्रीय सुरक्षा हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांची अमेरिकी काँग्रेससमोर सुनावणी होणार.
