Iran Internal Power Struggle: अमेरिकेबरोबर सुरु असलेल्या संघर्षातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जात असताना आता इराणमध्ये देशांतर्गत समस्यांनी तोंड वर काढले आहे. सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर मोजतबा यांची सर्वोच्चनेतेपदी घोषणा करण्यात आली असली तरी इराणकडे निर्णय घेणाऱ्या सक्षम नेतृत्वाचा अभाव असल्याचे दिसून आले आहे. नेतृत्वाशी मतभेद असल्याने आयआरजीसी पडद्यामागून सर्व निर्णय घेत असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, आता इराणमधील सत्तासंघर्ष तीव्र झाल्याचे वृत्त समोर आले असून, परराष्ट्रमंत्र्याची उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इराणी नेतृत्वात मतभेद
इराण इंटरनॅशनलच्या एका अहवालानुसार, इराणच्या नेतृत्वात मतभेद असल्याचे समोर आले आहे. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि सभापती मोहम्मद बागेर गालिबाफ परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांना पदावरून हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. आयआरजीसीबरोबर असलेल्या संबंधावरुन अराघची यांना हटवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे या अहवालात म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील इराणी नेतृत्वात काहीतरी घोळ असून त्यांच्यात सहमती होत नसल्याची शंका उपस्थित केली आहे. तसेच, मोजतबा यांची सर्वोच्च नेतेपदी निवड करण्यात आली असली तरी अद्याप त्यांनी सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती अथवा दर्शन घडलेले नाही.
अराघची आणि आयआरजीसीची जवळीक
देशातील सध्याचे नेतृत्वाने अराघची यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे. अराघची अध्यक्षांनी काही कल्पना न देता आयआरजीसीच्या सूचनांचे पालन करत आहेत. अण्वस्त्र चर्चांबाबत देखील अध्यक्षांना सांगितले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे, असे इराण इंटरनॅशनलच्या अहवालात म्हटले आहे. अराघची सरकारचे मंत्री म्हणून कमी आणि आयआरजीसीचे प्रमुख अहमद वाहिदी यांचे खास सहकारी म्हणून जास्त काम करत असल्याचा आरोप होत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून अराघची आयआरजीसीच्या सूचनेनुसारच काम करत आहेत. अराघची इराणच्या अध्यक्षांना विश्वासात घेत नसल्याचे सूत्रांनी इराण इंटरनॅशनला सांगितले.
पेझेश्कियान आणि अहमद वाहिदी यांचे मतभेद
अराघची सरकारची भूमिका मांडण्याऐवजी आयआरजीसीच्या प्रमुखांचे विचार अधिक मांडत असल्याची माहिती सूत्रांनी इराण इंटरनॅशनला दिली. हा प्रकार असाच सुरु राहिल्यास अराघची यांची परराष्ट्रमंत्री पदावरुन हकालपट्टी केली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले आहे. सध्या सुरु असलेल्या संघर्षावरुन आयआरजीसीचे प्रमुख अहमद वाहिदी आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्यात तीव्र मतभेद आहेत. युद्धासंबंधित सर्व निर्णय घेण्याची आणि भूमिका मांडण्याची जबाबदारी वाहिदी यांनी स्वत:च्या हातात घेतली आहे. वाहिदी यांनी युद्धात मरण पावलेल्या मंत्र्यांच्या जागी नव्या नियुक्त्या देखील रोखून ठेवल्याचे सांगितले जाते.
अंतर्गत मतभेद
अमेरिकेबरोबर चर्चेसाठी जाणाऱ्या शिष्टमंडळाला पाठिंबा देणाऱ्या संसदीय निवेदनावर स्वाक्षरी करण्यास खासदारांच्या एका गटाने नकार दिला होता, तेव्हाच इराणच्या नेतृत्वातील अंतर्गत मतभेद स्पष्ट झाले होते. या मतभेदानंतर, चर्चेत अण्वस्त्र कार्यक्रमाचा समावेश करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल फटकारल्यामुळे गालिबाफ यांनी इराणी शिष्टमंडळ संघाच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला. अमेरिकेसोबतच्या चर्चेच्या पहिल्या फेरीत इस्लामाबादमध्ये इराणी शिष्टमंडळाचे नेतृत्व त्यांनी केले होते. सध्या ही जबाबदारी अराघची यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
