Iran Power Struggle IRGC vs Pezeshkian: अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध कडवी झुंज देणाऱ्या इराणमध्ये आता अंतर्गत सत्तासंघर्ष पेटला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध समाप्तीसाठी समंजस नेत्यांसोबत वाटाघाटी सुरू असल्याचा दावा केला. पण, इराणने मात्र तो दावा फेटाळला आहे. अशात इराणमध्ये सरकार नेमकं कोण चालवत आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ‘इराण इंटरनॅशनल’च्या एका अहवालानुसार, इराणचे राष्ट्राअध्यक्ष मसूद पेझेश्कियान बाजूला सारून इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) नियंत्रण मिळवल्याचे वृत्त समोर आले आहे.
आयआरजीसीकडे संपूर्ण नियंत्रण
समोर आलेल्या माहितीनुसार, इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांना पूर्णपणे बाजूला करण्यात आले आहे. संघर्षात अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना प्रभावीपणे उत्तर देणाऱ्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने तेथील प्रशासनावर नियंत्रण मिळवल्याचे वृत्त आहे. आयआरजीसीचं सरकारचे सर्व निर्णय घेत असून, निर्णय प्रक्रियेवरही त्यांचेच प्रभुत्व असल्याचे अहवालात म्हटले आहे.
मिलिटरी परिषदेची स्थापना
अहवालातून समोरा आलेल्या माहितीनुसार, आयआरजीसीने मिलिटरी परिषद स्थापन केली असून, यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ते सर्व निर्णय घेत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. कॉर्प्सने सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्या सुरक्षेसाठी देखील कठोर नियोजन केले आहे. खामेनी यांच्यापर्यंत देशातील सध्याच्या परिस्थितीची माहिती पोहचू दिली जात नसल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांची मोजतबा खामेनी यांना भेटण्याची विनंती देखील आयआरजीसीने धुडकावून लावल्याचे सांगितले जाते.
आयआरजीसीचे प्रमुख कमांडर अहमद वाहिदी
मोजतबा खामेनी आणि राजकीय नेत्यांमध्ये सध्या अजिबात संवाद होत नसल्याचा दावा देखील या अहवालात करण्यात आला आहे. आयआरजीसीने राष्ट्राध्यक्षांकडे निर्णयाचे अधिकारचे शिल्लक ठेवले नसल्याचे सांगितले जाते. पेझेश्कियान यांनी गेल्या आठवड्यात गुप्तचर विभागाच्या मंत्रिपदी केलेल्या निवडीचा प्रयत्न आयआरजीसीचे प्रमुख कमांडर अहमद वाहिदी यांनी दबाव टाकून माघारी घेण्यास भाग पाडले. मोहम्मद पाकपौर यांच्या मृत्यूनंतर वाहिदी यांनी आयआरजीसीचे सूत्रे हाती घेतली आहेत.
पेझेश्कियान-आयआरजीसीमध्ये सत्तासंघर्ष
अहमद वाहिदी यांनी महत्वाची आणि संवेदनशील माहिती आयआरजीसीनेच हताळावी यासाठी आग्रह धरला आहे. दरम्यान, यामुळे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान आणि आयआरजीसीमध्ये सत्तासंघर्ष उफाळला असल्याची माहिती समोर आली आहे. आखाती देशांवर इराणकडून होणाऱ्या हल्ल्यांबाबत पेझेश्कियान यांनी नाराजी व्यक्त केली होती. यामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती. पण, सध्या आयआरजीसीने इराणची सूत्रे हाती घेतली असून, सर्व निर्णय त्यांच्याकडून घेतले जात असल्याचा दावा केला जात आहे.
मोजतबा खामेनी कुठे आहेत?
अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मोजतबा खामेनी यांची इराणच्या सर्वोच्च नेतेपदी निवड करण्यात आली. पण, त्यांचा देखील मृत्यू झाल्याचा दावा केला जातो. तर, काहीजण मोजतबा कोमामध्ये असून, त्यांच्यावर रशियात उपचार सुरु असल्याचा दावा करत आहेत. मोजतबा यांनी देखील थेट प्रसारण किंवा इतरत्र उपस्थित दर्शवली नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचा एक संदेश वृत्तवाहिनीवर वाचून दाखविण्यात आला होता.
