डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा विरोध करा, असे आवाहनच इराणने अमेरिकेतील मतदारांना केले आहे. इराणी इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गॉर्ड कॉर्प्सच्या (आयआरजीसी) वतीने अमेरिकेतील मतदारांना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे धोरण नाकारुन, पुन्हा भ्रष्टाचारी नेत्याच्या हाती सत्ता न देण्याचे आवाहन केले आहे. आयआरजीसीने याबाबतचे सविस्तर पत्र अमेरिकी मतदारांना मध्यावधी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर लिहले असून, या युद्धातून अमेरिकेच्या हाती काही लागले नाही असाही उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.
आयआरजीसीचे अमेरिकी मतदारांना पत्र
अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात सुरु केलेल्या युद्धाला सात महिने पूर्ण झाले आहेत. यानंतर अमेरिकेत होऊ घातलेल्या मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकी मतदारांना आवाहन करणारे पत्र लिहले आहे. पत्रातून अमेरिकी आणि इराणी नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. आयआरजीसीने लिहलेल्या या पत्रात अमेरिकेने इस्रायला पाठिंबा देऊ नये तसेच, इतर लष्करी कारवायांच्या समर्थन करुन नये असेही आवाहन करण्यात आले आहे. अमेरिकेने धोरणात बदल केल्यास दोन्ही देशांमध्ये शांततापूर्ण संबंध प्रास्थापित होऊ शकतात, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
नेतृत्वाबाबत विचार करा – आयआरजीसी
आयआरजीसीचे प्रवक्ते जेन होसेन मोहेबी यांनी मंगळवारी तेहरानमध्ये आयोजित पत्रकार परिषदेतून या पत्रातील मजकुराची माहिती दिली. अमेरिकेने पराभव मान्य करावा आणि माघार घ्यावी एवढा एकच मार्ग संघर्ष संपविण्यासाठी उपलब्ध असल्याचे मोहेबी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. अमेरिकी नागरिकांनी त्यांच्या नेतृत्वाबाबत एका सखोल विचार करावा आणि ट्रम्प प्रशासनावर दबाव टाकण्याचे आवाहन केले. अमेरिकेतील निवडणुकीच्या पाच आठवड्यांच्या पूर्वी इराणने प्रसिद्ध केलेल्या पत्राला महत्व प्राप्त झाले आहे.
अण्वस्त्र कार्यक्रमाचे कारण खोटे
अमेरिकेतील राजकीय यंत्रणा कमकुवत झाल्याचा दावा आयआरजीसीने या पत्रातून केला आहे. या पत्रामुळे अमेरिकी प्रशासनावर काही फरक पडेल अशी अपेक्षा नाही मात्र, मतदारांनी तरी हा संदेश गांभीर्याने घ्यावा अशी आशा मोहेबी यांनी व्यक्त केली. अमेरिकेकडून इराणशी युद्धाचे अण्वस्त्र कार्यक्रम हे मुख्य कारण दिले जाते. याचा उल्लेख देखील पत्रात करण्यात आला असून, इराणमध्ये सुरु असणाऱ्या युरेनियम संवर्धनाचे काम नागरी उपयोगासाठी असल्याचे आयआरजीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. इराण अण्वस्त्रांच्या मागे नसल्याचे अमेरिकेला देखील माहिती आहे, असा दावा मोहेबी यांनी केले. दरम्यान, व्यापक धोरण आणि आर्थिक फायद्यासाठी अमेरिका अण्वस्त्राचे कारण पुढे करत असल्याचेही मोहेबी म्हणाले.
मतदारांना आवाहन
अमेरिकेने यानंतर इराणमध्ये सत्ताबदल आणि विभाजन करण्याचे ध्येय देखील बाळगले पण त्यांना तेही शक्य झाले नाही, असेही आयआरजीसीच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. इराणमध्ये अमेरिका आणि इस्रायलने खूप नुकसान केले मात्र, त्यांना त्यांचे लक्ष्य पूर्ण करता आले नाही, असे म्हणत इराणचा युद्धात विजय झाल्याचा दावा पत्रातून करण्यात आला आहे. पत्रात पुढे अमेरिकी मतदारांना जागे होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
