Pakistan cargo ship Selen blocked near Strait of Hormuz: होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी जहाजाला इराणी सैन्याने रोखल्याची घटना समोर आली आहे. वाहतुकीच्या परवानगीअभावी जहाजाला होर्मुझच्या प्रवेशद्वारावरुन माघारी फिरावे लागले. संयुक्त अरब अमिरातीच्या शारजा बंदरातून ‘सेलेन’ जहाज कराचीच्या दिशेने निघाले होते. पण, परवानगी नसल्याने इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) सैनिकांनी जहाजाला प्रवेशद्वारावरच रोखून माघारी पाठवले.

संघर्षापासून होर्मुझ सामुद्रधुनी बंद

अमेरिक – इस्रायलविरुद्ध सुरु असलेला इराणचा संघर्ष आता चौथ्या आठवड्यात पोहोचला आहे. संघर्षानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. यामुळे जलमार्गाद्वारे होणारी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. पर्शियन आखाताला जोडणारा हा अत्यंत महत्वाच जलमार्ग मानला जातो. पण, संघर्ष सुरु झाल्यानंतर इराणने सामुद्रधुनी बंद केल्याने जगाच्या गॅस आणि इंधन पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. 

 IRGC कमांडरची पोस्ट

सेलेन कराचीच्या दिशेने मार्गक्रमण करत होते. पण, सामुद्रधुनी पार करण्याची आवश्यक परवानगी नसल्याने इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स नैदलाच्या सैनिकांनी जहाजाला माघारी पाठवले. IRGC चे कमांडर अलीरेजा तांगसिरी यांनी याबाबत एक्सवरुन माहिती दिली आहे. सामुद्रधुनी पार करण्यासाठी संपूर्ण सहकार्य अपेक्षित असल्याचेही त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे. 

पाकिस्तानची मध्यस्थीची भूमिका

पाकिस्तान सध्या अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष मिटविण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी प्रकरणी स्पष्ट भूमिका घेत मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे. ट्रम्प यांनी देखील शाहबाज यांचे याबाबतची पोस्ट एक्सवर शेअर केली आहे. अमेरिकेने १५ कलमी शांतता प्रस्ताव पाकिस्तानच्या माध्यमातून इराणसमोर ठेवल्याचे वृत्त आहे तर, इराणने देखील सात अटी संघर्ष थांबविण्यासाठी ठेवल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तान मध्यस्थीची भूमिका कशा पद्धतीने पार पाडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

लाभाची अपेक्षा

शांततेसाठी मध्यस्थी करण्यासाठी तयारी दर्शवणाऱ्या पाकिस्तानला यातून मोठा फायदा अपेक्षित आहे. पाकिस्तानचा अगोदरच अफगाणिस्तानबरोबर संघर्ष सुरु आहे, त्यात इंधन आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याने तेथील अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्यासह सामन्य नागरिकांनाही चटका बसत आहे.