Iran Israel War Update : अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात पुकारलेल्या युद्धाला ८ एप्रिल रोजी विराम देण्यात आला होता. आता बरोबर दोन महिन्यांनी इराणने पुन्हा एकदा इस्रायलविरोधात हल्ले सुरू केले आहेत. इराणने रविवारी रात्री उत्तर इस्रायलच्या काही भागात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. तर, इस्रायलनेही प्रतिहल्ला केला आहे.
इस्रायली लष्कराने या हल्ल्याविषयी सांगितले की, इराणमधून डागलेली क्षेपणास्त्रे इस्रायली लष्कराने शोधून काढली असून त्वरित हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी रहिवाशांना येणाऱ्या धोक्याची चेतावणी दिल्याने अनेक भागांत सायरन वाजले. X (ट्विटर) वर पोस्ट केलेल्या एका निवेदनात इस्रायली लष्कराने म्हटले आहे, “आयडीएफने (IDF) इराणकडून इस्रायलच्या दिशेने डागलेली क्षेपणास्त्रे ओळखली आहेत. धोक्याचा प्रतिकार करण्यासाठी संरक्षण यंत्रणा कार्यरत आहेत. हवाई दलाने आतापर्यंत इराणमधून डागलेली सर्व क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली आहेत.” इस्रायलच्या दिशेने आणखी क्षेपणास्त्रे डागल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये कोणत्याही जीवितहानी किंवा नुकसानीचे वृत्त नाही.
दरम्यान, ट्रम्प यांनी ‘फॉक्स न्यूज’ आणि ‘एक्सिओस’शी बोलताना सांगितलं की, त्यांनी नेतन्याहू यांना इराणविरुद्ध कोणतीही सूडबुद्धीची कारवाई न करण्याचे आणि पुन्हा चर्चेच्या टेबलावर येण्याचे निर्देश दिले आहेत. ट्रम्प यांची ही भूमिका इस्रायली लष्कराच्या विधानांशी पूर्णपणे विसंगत आहे.
बैरुतवरील हवाई हल्ल्यानंतर क्षेपणास्त्र हल्ला
८ एप्रिल रोजी युद्धबंदी लागू झाल्यापासून इराणने इस्रायलवर पहिला थेट हल्ला केला आहे, यामुळे अनेक महिन्यांची नाजूक शांतता संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे. इस्रायलने बैरुतवर हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर दिले जाईल, अशी चेतावणी इराणने वारंवार दिली होती. दक्षिण लेबनॉनमधील इस्रायलच्या लष्करी मोहिमेमुळे इराणने अमेरिकेसोबतची अप्रत्यक्ष चर्चा स्थगित केली होती. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी हस्तक्षेप करत इस्रायल आणि हेजबोला यांच्यात अंशतः युद्धबंदीची घोषणा केली होती. मात्र, दोन्ही बाजूंनी हल्ले सुरूच ठेवल्याने ही युद्धबंदी त्याच दिवशी मोडीत निघाली.
इस्रायली सैन्याने हेजबोलाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बैरुतच्या दक्षिण उपनगरांवर हवाई हल्ले केल्यानंतर अवघ्या काही तासांतच ही क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या हल्ल्यांनी दाहियेह (Dahiyeh) जिल्ह्याला लक्ष्य केले आणि त्याला तेहरानकडून तीव्र प्रतिक्रिया मिळाली. लेबनॉनच्या राजधानीवर इस्रायलने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा इराणी अधिकाऱ्यांनी आधीच दिला होता.इराणची तीव्र चेतावणीक्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने सांगितले की, त्यांनी आयआरजीसी (IRGC) एरोस्पेस फोर्सद्वारे डागलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी इस्रायलच्या ‘रामत डेव्हिड एअर बेस’ला लक्ष्य केले.
इराणी लष्करी अधिकाऱ्यांनी इस्रायलला नवीन इशारा दिला आहे. इराणी सरकारी माध्यमांनी दिलेल्या निवेदनानुसार, इराणच्या खातम अल-अंबिया दलाच्या कमांडरने इस्रायलवर बैरुतच्या दक्षिण उपनगरांना लक्ष्य करून आणि दक्षिण लेबनॉनमध्ये लष्करी कारवाया वाढवून सर्व मर्यादा ओलांडल्याचा आरोप केला. निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही आधीच इशारा दिला होती की जर बैरुतच्या उपनगरातील गुन्हेगारी वाढली, तर आम्ही व्याप्त प्रदेशातील लक्ष्यांवर हल्ला करू.” लष्करी कमांडरने इस्रायलला लेबनॉनवरील हल्ले थांबवण्याचा किंवा गंभीर परिणामांना सामोरे जाण्याचा इशाराही दिला.
तर विध्वंसक हल्ले सुरू होतील
“इस्रायली लष्कराने दक्षिण लेबनॉन आणि उपनगरांवरील आपले हल्ले थांबवले पाहिजेत. जर त्यांनी या भागातील आपले हल्ले वाढवले किंवा इराणच्या कारवाईला प्रत्युत्तर दिले, तर त्यांना अधिक विनाशकारी आणि खेदजनक हल्ल्यांना सामोरे जावे लागेल. तसेच इस्रायल आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्यांविरोधात विध्वंसक हल्ले सुरू केले जातील.” या दोन्ही देशांमधील संघर्षामुळे संपूर्ण भागात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
इस्रायलकडूनही प्रत्युत्तर
इराणने हल्ला केल्यानंतर इस्रायल लष्कराकडूनही प्रतिहल्ले सुरू झाले आहेत.
