Iran Israel Conflict : इराण आणि इस्रायल यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. यादम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशात शस्त्रविरामाबाबत एकमत झाले, मात्र याच्या काही तासांतच तेहरानने तेव अवीववर नव्याने क्षेपणास्त्र डागल्याचा दावा इस्रायलने केला आहे. हे शस्त्रविरामाचे उल्लंघन असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. तसेच इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी मंगळवारी सांगितले की त्यांनी इराणच्या शस्त्रविरामाच्या उल्लंघनाला जोरदार प्रत्युत्तर देण्याचे निर्देश लष्कराला दिले आहेत.
असे असले तरी इराणने हा दावा फेटाळून लावला आहे, इराणच्या सरकारी माध्यमांनी शस्त्रविराम लागू झाल्यानंतर इस्रायलवर कोणतेही क्षेपणास्त्र डागले गेले नसल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल व इराण यांच्यात शस्त्रविराम झाल्याची घोषणा केली होती. “मी दोन्ही देशांशी चर्चा केली आणि दोन्ही देशांनी यासाठी सहमती दर्शवली आहे,” असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं.
इराण-इस्रायल संघर्षात आत्तापर्यंत काय घडलं?
इराणने नव्याने क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा इस्त्रायली डिफेन्स फोर्सेसकडून करण्यात आला आहे, यादरम्यान अनेक इस्त्रायली शहरांमध्ये सायरनचा आवज घुमला, यामुळे तेल अवीव येथील नागरिकांना पुन्हा एकदा बॉम्ब शेल्टरमध्ये आश्रय घ्यावा लागला.
इराणने इस्त्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांनी घोषित केलेल्या शस्त्रविरामाचे उघड उल्लंघन केल्यामुळे, आणि अशा कोणत्याही उल्लंघनाला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या इस्रायली सरकारच्या धोरणामुळे, मी आयडीएफला (इस्रायली डिफेन्स फोर्सेस) तेहराणमधील शासकिय मालमत्ता आणि दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य करत उच्च-तीव्रतेच्या कारवाया सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत,” असे इस्रायलचे संरक्षण मंत्री काट्झ म्हणाले आहे.
दोन्ही देशांनी त्यांचे फायनल मिशन पूर्ण केल्यानंतर मंगळवारी पहाटे (भारतीय वेळेनुसार) ट्रम्प यांनी ९.३० वाजता शस्त्रविरामाची घोषणा केली. पण हे ‘फायनल ऑपरेशन’ काय होते याबद्दल मात्र खुलासा करण्यात आलेला नाही.
इराणने इस्रायलवर चार हल्ले केल्यानंतर अखेर शस्त्रविरामाची घोषणा केली, इराणच्या या हल्ल्यात दक्षिम इस्त्रायलमधील किमान चार जण ठार झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांनी संघर्ष थांबवण्यास सहमती दर्शवल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांचे कौतुक केले. ते म्हणाले की, “हे असे युद्ध आहे जे अनेक वर्ष चालू शकले असते आणि यामुळे संपूर्ण मध्य पूर्व नष्ट झाले असते, पण तसे झाले नाही आणि कधीही होणार नाही.”
राजनैतिक सूत्रांच्या हवाल्याने वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, कतारने मध्यस्थी केलेल्या आणि अमेरिकेने मांडलेल्या प्रस्तावावर तेहरानने सहमती दर्शवली आहे. इराण आणि इस्रायल या दोन्हीकडून पुन्हा नव्याने तणाव वाढण्याची धमकी देण्यात आल्याच्या काही मिनिटांतच शस्त्रविरामावर एकमत झाल्याचे सांगितले जात आहे.