CBSE postpones Class 12 exams in Middle East: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मध्यपूर्वेतील काही देशांमध्ये होणाऱ्या बारावीच्या बोर्ड परीक्षांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक ताणाचा विचार करून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

सात देशांतील परीक्षा पुढे ढकलल्या

मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) बारावीच्या बोर्ड परीक्षांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बहरेन, इराण, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांमधील CBSE संलग्न शाळांमधील बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

मानसिक ताणाचा विचार करून निर्णय

‘सीबीएसई’ने ९ मार्च २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, १२ मार्च २०२६ (गुरुवार) ते १६ मार्च २०२६ (सोमवार) दरम्यान होणाऱ्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक ताण आणि निर्माण झालेली अनिश्चितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ १४ मार्च २०२६ रोजी पुन्हा परिस्थितीचा आढावा घेणार असून १६ मार्चनंतर होणाऱ्या उर्वरित परीक्षांबाबत पुढील निर्णय घेतला जाईल. परीक्षांच्या नवीन तारखा नंतर जाहीर केल्या जातील, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळांशी संपर्कात राहून अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवावे, असेही ‘सीबीएसई’ने विद्यार्थ्यांना सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. अशा परिस्थितीत बारावीच्या परीक्षा आयोजित करणे धोकादायक ठरू शकते, याचा विचार करून ‘सीबीएसई’ने हा निर्णय घेतला आहे.

युद्धामुळे परीक्षांवर परिणाम

इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणवरील हल्ल्यांमध्ये वाढ केली आहे. इराणच्या इंधन साठ्यांवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करण्यात येत आहेत. तर इराणने त्याला प्रत्युत्तर देत इस्त्रायलमधील अनेक शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. तसेच मध्यपूर्वेतील अनेक देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवरही इराणने हल्ले केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या युद्धाचा परिणाम बहरेन, इराण, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांमध्येही जाणवत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून ‘सीबीएसई’ने तीन दिवसांवर आलेल्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.