नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) दिलेल्या माहितीनुसार पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारताने इराणमधून १,७७७ भारतीय नागरिकांच्या मायदेशी परतण्याची सोय केली आहे. मंत्रालयाने नमूद केले की, इराण, आर्मेनिया आणि अझरबैजानच्या अधिकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे ही सोय शक्य झाली.

अलीकडील घडामोडींवर बोलताना, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, तेहरानमधील भारतीय दूतावास लोकांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नांमध्ये सातत्याने समन्वय साधत आहे. “आमच्या तेहरानमधील दूतावासाने आतापर्यंत इराणमधील १,७७७ भारतीय नागरिकांना आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तेथून ते विमानाने भारतात परत येत आहेत,” असे ते म्हणाले.

त्यांनी पुढे सांगितले की, या एकूण संख्येत ८९५ भारतीय विद्यार्थी आणि इराणमधील विविध कंपन्यांमध्ये कामाला असलेले ३४५ भारतीय मच्छीमार यांचा समावेश आहे. या मच्छीमारांना ओर्मेनियामार्गे बाहेर काढण्यात आले आणि ते ४ एप्रिल रोजी विमानाने भारतात परतले, चेन्नई येथे उतरले. भारतीय नागरिक मायदेशी दाखल झाल्यावर परराष्ट्र मंत्री (ईएएम) एस जयशंकर यांनी संघर्षाच्या काळात इराणमधून भारतीय मच्छिमारांना बाहेर काढण्याची सोय केल्याबद्दल आर्मेनिया परराष्ट्र मंत्री अरारत मिर्झोयान यांचे आभार मानले.

आर्मेनिया सरकारचे आभार

“आज इराणमधून भारतीय मच्छिमारांना आर्मेनियामार्गे भारतात परत आणण्यासाठी मदत केल्याबद्दल परराष्ट्र मंत्री अरारत मिर्झोयान आणि आर्मेनिया सरकारचे आभार,” असे जयशंकर यांनी X वरील एका पोस्टमध्ये लिहिले. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी पुढे सांगितले की, भारतीय नागरिकांव्यतिरिक्त, दूतावासाने बांगलादेश आणि श्रीलंका या दोन परदेशी नागरिकांनाही मायदेशी परत आणण्यासाठी मदत केली.

याविषयी माहिती देताना जैस्वाल म्हणाले की, १,५४५ भारतीय नागरिक अर्मेनियामध्ये दाखल झाले, तर स्थलांतर प्रक्रियेचा भाग म्हणून २३४ जणांना अझरबैजानमध्ये हलवण्यात आले. “दूतावासाने भारतीय नागरिकांसोबतच, बांगलादेश आणि श्रीलंका येथील प्रत्येकी एका अशा दोन परदेशी नागरिकांच्या प्रवासाचीही सोय केली आहे. एकूण १,५४५ भारतीय नागरिकांनी आर्मेनियातून आणि २३४ जणांनी अझरबैजानमध्ये प्रवेश केला,” असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

मृतांचे पार्थिव भारतात येण्यासाठीही सहकार्य

संघर्षात ठार झालेल्या भारतीय नागरिकांच्या संख्येबद्दल बोलताना जयस्वाल म्हणाले की, सुरू असलेल्या संघर्षात आठ जणांचा मृत्यू झाला असून, एक जण अद्याप बेपत्ता आहे. त्या व्यक्तींपैकी सात जणांचे पार्थिव भारतात परत आणण्यात आले असून, ओमानमधील एका व्यक्तीचे पार्थिव काही तांत्रिक अडचणींमुळे अद्याप प्रलंबित आहे.

पश्चिम आशियातील संघर्षात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला असून, एक जण अद्याप बेपत्ता आहे. त्यांच्यापैकी सात जणांचे पार्थिव भारतात परत आणण्यात आले असून, एकाचा मृतदेह तांत्रिक बाबी मुळे अद्याप परत आलेला नाही. ओमानमधील आमचा दूतावास उर्वरित पार्थिव भारतात परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे,” असेही ते म्हणाले.

युद्धाची पार्श्वभूमी

२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त लष्करी हल्ल्यात इराणचे ८६ वर्षीय सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची हत्या झाल्यानंतर पश्चिम आशियातील संघर्षाला सुरुवात झाली. प्रत्युत्तर म्हणून तेहरानने अनेक आखाती देशांमधील इस्रायल आणि अमेरिकेच्या मालमत्तांना लक्ष्य केले, ज्यामुळे जलमार्गांमध्ये व्यत्यय आला आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारपेठा व जागतिक आर्थिक स्थिरतेवर परिणाम झाला.