वृत्तसंस्था, वॉशिंग्टन, दुबई – पश्चिम आशियामध्ये इराण आणि इस्रायलने परस्परांवरील हल्ले तीव्र केले असताना इराण युद्ध आणखी काही आठवडे चालेल असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले. “इराणविरोधातील लष्करी मोहिमांसाठी चार ते पाच आठवडे लागतील असा अंदाज होता, पण त्यापेक्षा अधिक काळ युद्ध लढण्याची अमेरिकेची क्षमता आहे,” असे ट्रम्प म्हणाले. त्याचवेळी, इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी मात्र, हे युद्ध लवकर संपेल असे ‘फॉक्स’ या वृत्तवाहिनीला मुलाखतीत सांगितले. दरम्यान, या युद्धात आतापर्यंत इराणमध्ये ७८७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ‘रेड क्रेसेंट सोसायटी’ने दिली.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची शनिवारी हत्या करण्यात आल्यानंतर दोन्ही बाजूंनी परस्परांवरील हल्ल्यांची तीव्रता वाढली आहे. तेहरानमध्ये सोमवारी रात्रभर आणि मंगळवारी पहाटे स्फोटांचे आवाज ऐकू येत होते. तर इराणने इस्रायलसह लगतच्या आखाती देशांना लक्ष्य केले आहे. जगासाठी महत्त्वाच्या असलेल्या तेल आणि नैसर्गिक वायूंच्या उत्पादनाला इराणने लक्ष्य केले आहे.
विशेषतः ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आहेत आणि आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, त्या सौदी अरेबिया, जॉर्डन, बहारिन, कुवेत, कतार, संयुक्त अरब अमिराती या देशांमधील लष्करी तळ, हॉटेल, व्यावसायिक इमारती, विमानतळ इत्यादींवर इराण हल्ले करत आहे. हल्ल्यांची तीव्रता आणि युद्ध थांबवण्यासाठी कोणत्याही योजनेचा अभाव, यामुळे हे युद्ध दीर्घकाळ चालेल आणि त्याचे दूरगामी परिणाम होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
इराणच्या अध्यक्षांच्या कार्यालयाचे नुकसान
इराणच्या अध्यक्षांच्या कार्यालयावर आणि इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या इमारतीवर आपण हल्ला केल्याचे इस्रायलच्या लष्कराने मंगळवारी सांगितले. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या इमारतीमध्ये इराणच्या संरक्षणाशी संबंधित महत्त्वाच्या बैठका आयोजित केल्या जातात. याबरोबर लष्करी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण संस्था आणि इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले आहे. हे हल्ले सोमवारी रात्रीतून केल्याचे सांगण्यात आले.
लेबनॉनमध्ये ५२ जणांचा मृत्यू
लेबनॉनस्थित आणि इराणचे समर्थन असलेल्या हेजबोला गटाने सोमवारी इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली. प्रत्युत्तरादाखल इस्रायलने राजधानी बेरुतवर केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान ५२ जणांचा मृत्यू झाला आणि अन्य १५४ जखमी झाले, अशी माहिती लेबनॉनमधील अधिकाऱ्यांनी दिली. लेबनॉननच्या सीमेवर आणखी सैन्य तैनात केले असल्याचे इस्रायलने सांगितले आहे. दरम्यान इराकमधील इराणशी संबंधित अतिरेकी गटानेही तेथील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ले केल्याचा दावा केला आहे.
इस्रायली लष्कराने बेरुतच्या दक्षिण भागात हेजबोलाच्या ‘अल-मनार’ टीव्ही आणि ‘अल-नूर’ रेडिओ स्टेशन असलेल्या इमारतीवर हल्ले केले. यापूर्वी २००६मध्ये इस्रायल-हेजबोला युद्धादरम्यान ‘अल-मनार’ टीव्ही आणि ‘अल-नूर’ रेडिओ स्टेशनवर हल्ले करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी गुप्त ठिकाणांहून कार्यक्रमांचे प्रसारण सुरू ठेवले होते.
फ्रान्स सायप्रसला युद्धनौका पाठवणार
सायप्रसमधील ब्रिटनच्या लष्करी तळावर ड्रोन हल्ला झाल्यानंतर मदतीसाठी फ्रान्स युद्धनौका पाठवत असल्याचे सायप्रसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. फ्रान्स सायप्रसला जमिनीवरील ड्रोन-विरोधी, क्षेपणास्त्र-विरोधी अतिरिक्त यंत्रणाही पाठवत असल्याचे सांगण्यात आले. याबरोबरच जर्मनीनेही मदतीच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे तीन अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
ही मोहीम चार ते पाच आठवडे चालण्याची शक्यता आहे पण आमची त्याहीपेक्षा अधिक काळ लढण्याची तयारी आहे. अमेरिकेकडे शस्त्रास्त्रांचा अगणित पुरवठा आहे आणि आम्ही उच्च दर्जाची शस्त्रे आधीच तैनात केली आहेत. आम्ही दीर्घकाळ यशस्वीपणे युद्ध लढू शकतो. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका
सौदी, कुवेतमधील अमेरिकेचे दूतावास लक्ष्य
दुबई : इराणने मंगळवारी पहाटे सौदी अरेबियातील अमेरिकेच्या दूतावासावर ड्रोन हल्ले केले. रियाधमधील दूतावासावर दोन ड्रोनने केलेल्या हल्ल्यात दूतावासाच्या काही भागाला आग लागली आणि किरकोळ नुकसान झाले, अशी माहिती सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. तर दूतावासाजवळ येऊ नये असे आवाहन सौदी अरेबियातील अमेरिकी नागरिकांना करण्यात आले. त्यापूर्वी इराणने कुवेतमधील अमेरिकेच्या दूतावासावरही हल्ला केला. हे दूतावास पुढील सूचना दिली जाईपर्यंत बंद करण्यात आल्याचे कुवेत सरकारने मंगळवारी जाहीर केले. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने कुवेत, बहारिन, इराक, कतार, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या आणि आपत्कालीन सेवेत नसणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खबरदारीचा उपाय म्हणून ते देश सोडावेत, अशा सूचना दिल्या आहेत.
