एपी, दुबई : इराणचे उच्च स्तरावरील सुरक्षा अधिकारी आणि ‘रिव्होल्युशनरी गार्ड’चे बसिज गटाचे प्रमुख मारले गेले असल्याचा दावा इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी मंगळवारी केला. इराणने इस्रायल आणि शेजारी आखाती देशांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा मारा मंगळवारीही सुरूच ठेवला.
इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल काट्झ यांनी सांगितले, की इराणचे सुरक्षा अधिकारी अली लारिजानी आणि जनरल गुलाम रझा सोलेमनी सोमवारी रात्री इस्रायलने केलेल्या हल्ल्यात ठार झाले. इराणकडून अद्याप अधिकृतपणे कुठलीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
इस्रायलने सोमवारी रात्री तेहरान आणि लेबनॉनमधील हेजबोला गटावर जोरदार हल्ले केले.
हेजबोला गटाने इस्रायलच्या उत्तरेला लक्ष्य केल्याचे काट्झ यांनी सांगितले. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे दुबईचे हवाई क्षेत्र तात्पुरते बंद करावे लागले, तर अबुधाबीमध्ये एकाचा मृत्यू झाला. इराकमधील अमेरिकेच्या दूतावासावर दोन ड्रोन डागले.
दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला मोजताबा खामेनी यांनी तणाव निवळण्यासाठी मध्यस्थानी दिलेले प्रस्ताव धुडकावले आहेत. ‘‘अमेरिका आणि इस्रायलला गुडघे टेकायला लावू,’’ अशी प्रतिक्रिया इराणच्या वरिष्ठ अधिकार्याने मंगळवारी दिली. दोन देशांनी मध्यस्थीचा प्रयत्न केल्याची माहिती एका अधिकार्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. मोजताबा खामेनी यांनी अमेरिका आणि इस्रायलला धडा शिकविण्याची भूमिका घेतली होती.
‘‘मोजताबा रशियात नाहीत’’
मॉस्को : इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला मोजताबा खामेनी यांच्यावर मॉस्कोमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती खोटी आहे, असे स्पष्टीकरण इराणचे रशियातील राजदूर काझेम जलाली यांनी दिली. युद्धात मोजताबा जखमी झाल्याने त्यांना मॉस्कोला हलविण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.
(जन. सोलेमनी)
