Indians stranded in Bahrain: इस्त्रायल आणि अमेरिकेने आज (ता. २८) इराणवर संयुक्त हल्ला केला. त्यानंतर इराणनेही त्याला प्रत्युत्तर दिले. इराणने आखाती देशांतील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केले, तसेच इस्त्रायलमधील काही शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. दरम्यान, बहरीनमधील अमेरिकेच्या लष्करी तळालाही लक्ष्य करण्यात आले. शनिवारी सकाळी बहरीनमध्ये अचानक सायरन वाजू लागल्याने युनुस (नाव बदलले आहे) आणि इतर अनेक भारतीय नागरिकांना अभूतपूर्व परिस्थितीचा सामना करावा लागला.
इराणचे अमेरिकेला सडेतोड उत्तर
अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर तेहरानने आखाती देशांतील अमेरिकन मालमत्तांना लक्ष्य करत प्रत्युत्तर दिले. त्या पार्श्वभूमीवर तेथे राहणाऱ्या भारतीयांशी व्हिडिओ संवाद साधण्यात आला. हरियाणाचा रहिवासी असलेला युनुसने बहरीनमधील वाढत्या सुरक्षा परिस्थितीचे धक्कादायक तपशील आणि प्रत्यक्ष अनुभव सांगितले. ‘इंडिया टुडे’शी बोलताना त्याने ही माहिती दिली.
“लिफ्ट थांबल्या अन् गोंधळ सुरू झाला”
“सकाळी ११.३० वाजता मंत्रालयाकडून सर्वांनी सुरक्षित आश्रयस्थानी जावे, असा इशारा मिळाला,” असे गेल्या तीन वर्षांपासून बहरीनमध्ये राहणाऱ्या या आयटी व्यावसायिकाने सांगितले. सुमारे १०-१५ मिनिटांतच मोठा स्फोट ऐकू आला आणि परिसरात घबराट पसरली. त्यांच्या इमारतीतील लिफ्ट बंद पडल्याने परिस्थिती अधिकच गोंधळाची झाली, असे त्याने सांगितले. “लिफ्ट थांबल्या. आम्हाला पायऱ्यांचा वापर करून तात्काळ इमारत खाली करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर आणखी काही स्फोटांचे आवाज ऐकू आले,” असंही तो म्हणाला. त्यावेळी आकाशात धुराचे मोठे लोट उठताना दिसत होते.
बहरीनमधील अमेरिकन तळावर निशाणा
इराणने बहरीनच्या मुख्य शहराजवळील अमेरिकन नौदलाच्या पाचव्या ताफ्याच्या मुख्यालयाला लक्ष्य केल्याचे सांगितले जाते. युनुसच्या मते, त्याने सहा ते सात स्फोटांचे आवाज ऐकले. बहुतेक क्षेपणास्त्रे अमेरिकन सैन्याने हवेतच रोखली, असेही त्याने नमूद केले. युनुसने सांगितले की रमजान सुरू असूनही देशातील सामान्य जीवन विस्कळीत झाले आहे. टॅक्सी सेवा आणि स्थानिक दुकाने टप्प्याटप्प्याने बंद केली जात आहेत. आज अनेक दुकाने लवकर बंद झाली. रमजानमध्ये सहसा संध्याकाळी मोठी गर्दी असते; मात्र आज वातावरण शांत आणि चिंताग्रस्त होते, असे त्याने सांगितले.
भारतात येण्यासाठी विमान नाही
रस्त्यांवर चिंताग्रस्त नागरिकांची वर्दळ वाढली होती. हजारो लोक विमानतळाकडे रवाना झाले; परंतु बहरीनसह मध्य पूर्वेतील अनेक देशांनी आपले हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केले आहे. “सध्या भारतात परतण्यासाठी कोणतीही उड्डाणे उपलब्ध नाहीत. परिस्थिती स्थिर झाल्यावर भारतात परतण्याची माझी योजना आहे,” असे तो म्हणाला. बहरीनमध्ये सुमारे ३.५ लाख भारतीय नागरिक राहतात, ज्यामुळे तेथील भारतीय समुदाय हा सर्वात मोठा प्रवासी समुदाय आहे.
पंतप्रधान मोदींना विनंती
युनुस यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला परत येऊ इच्छिणाऱ्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची विनंती केली. “सरकारने आम्हाला बाहेर काढावे. अनेक भारतीयांना आश्रयस्थाने कुठे आहेत, याची माहिती नाही,” अशी त्यांची मागणी आहे.
