अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्ध धोकादायक वळणावर पोहोचले असून, इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी इस्रायलची हवाई सुरक्षा भेदून दिमोना आणि अराद या शहरांना रविवारी लक्ष्य केले. ही दोन्ही शहरे इस्रायलच्या अणुप्रकल्पापासून काही किलोमीटर अंतरावरच आहेत. इराणच्या नतान्झ अणुप्रकल्पाला लक्ष्य केल्याचा हा बदला मानला जात आहे. या हल्ल्यात अरादमध्ये ११५ जण जखमी झाले. त्यातील ९ गंभीर आहेत. दिमोनामधील जखमींचा आकडा उशिरापर्यंत प्राप्त झाला नाही. इस्रायलच्या उत्तरेकडेही हेजबोलाच्या हल्ल्यात एक जण ठार झाला.
दरम्यान, इस्रायलमध्ये उत्सर्जनाचा कुठलाही धोका नसल्याचे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने सांगितले. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू म्हणाले, ‘ही सायंकाळ अतिशय कठीण आहे. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात एकही मृत्यू झाला नाही, हा चमत्कार आहे.’
‘युद्ध संपण्याची चिन्हे नसल्याची प्रतिक्रिया इस्रायलचे लष्करप्रमुख जनरल एयाल झमीर यांनी दिली. तसेच, इराणने दोन टप्प्याचे आंतरखंडीय क्षेपणास्त्र डागल्याचेही सांगितले. इस्रायलच्या लष्कराने सांगितले, ‘इराणने दोन्ही शहरांवर केलेले हल्ले बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे पारंपरिक शस्त्रे वापरून केलेले हल्ले होते. इस्रायलची क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा इराणच्या क्षेपणास्त्रांना भेदू शकली नाही. दिमोना आणि अराद या शहरांना इराणच्या क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले. इस्रायलच्या नेगेव्ह येथील अणुसंशोधन केंद्राच्या ही शहरे अनुक्रमे २० आणि ३५ किलोमीटर अंतरावर आहेत. या भागात इराणने प्रथमच इस्रायलची हवाई संरक्षण यंत्रणा भेदली. इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इतमार बेन ग्विर यांनी अरादला रविवारी भेट दिली. ‘इराणबरोबर इस्रायलचे ऐतिहासिक युद्ध सुरू असून, विजय प्राप्त होईपर्यंत ते सुरू राहील,’ अशी टिप्पणी त्यांनी केली.
इस्रायलमध्ये रविवारी सकाळी धोक्याचे इशारे देणारे भोंगे वाजले. त्यानंतर नागरिकांना अवघी काही मिनिटे सुरक्षित स्थळी जाण्यासाठी मिळतात. इस्रायलच्या हवाई सुरक्षेवर सारे निर्भर असते. मात्र, ही हवाई सुरक्षा भेदून इराणची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे दोन शहरांवर आदळली. हवाई सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरल्याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती इस्रायलने दिली.
अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या दिमोना शहराच्या हवाई सुरक्षेमध्ये इस्रायलला अपयश आले आहे. युद्धाचा हा नवा टप्पा आहे. – मोहम्मद बाघेर गालिबाफ, अध्यक्ष, इराणी पार्लमेंट
आमचा लढा साऱ्या जगासाठी – नेतान्याहू
जेरुसलेम : इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी रविवारी क्षेपणास्त्र हल्ला झालेल्या अराद शहराला भेट दिली. अमेरिका आणि इस्रायल संपूर्ण जगासाठी लढा देत असल्याचे ते म्हणाले. इराणकडून असलेल्या धोक्याचा पुरावा हवा असेल तर गेल्या ४८ तासांतील उदाहरणे घ्या, असे नेतान्याहू म्हणाले. इराणविरुद्ध लढण्यासाठी साऱ्या जगाने एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.
इराणने दिएगो गार्सिया तळावर केलेल्या हल्ल्यातून त्यांची युरोपमध्ये आतपर्यंत जाण्याची आणि संपूर्ण जगाला धोका निर्माण करण्याची क्षमता अधोरेखित होते. इराणने नागरी भागाला लक्ष्य केले आहे. इराण आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारी मार्ग रोखत आहे. संपूर्ण जगाला वेठीस धरत आहे. यापेक्षा अधिक कुठला पुरावा तुम्हाला हवा आहे? – बिन्यामिन नेतान्याहू, पंतप्रधान, इस्रायल
