तेहरान / वॉशिंग्टन / दुबई : इराण आणि अमेरिका व इस्रायल यांच्यात गेले ३९ दिवस सुरू असलेली धुमश्चक्री थांबवून, पाकिस्तानच्या पुढाकाराने बुधवारी शस्त्रसंधीच्या मुद्द्यावर तिन्ही देशांमध्ये मतैक्य झाले खरे. पण हा शस्त्रसंधी लेबनॉन आणि हेझबोलावरील कारवाईस लागू नाही अशी भूमिका इस्रायल आणि अमेरिकेने घेतली.

तो घोषित झाल्यानंतर अवघ्या काही तासांत इस्रायलकडून झालेल्या हल्ल्यात लेबनॉनमधील २००हून अधिक नागरिक ठार झाले. त्यामुळे संतप्त होऊन इराणने होर्मुझ सामुद्रधुनीची पुन्हा नाकेबंदी केली. तसेच लेबनॉनवरील हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचीही घोषणा केली.

अमेरिकी वेळेनुसार मंगळवारी रात्री साडेआठ वाजता आणि भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे साडेचार वाजता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धसमाप्तीच्या वाटाघाटींसाठी दोन आठवड्यांचा शस्त्रसंधी जाहीर केला. त्यास इराणकडूनही लगेच मान्यता मिळाली. पाकिस्तानच्या शिष्टाईने घडून आलेल्या या विरामामुळे जगभर समाधान व्यक्त करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय तेल, भांडवल, चलन बाजारांमध्येही या घटनेचे सकारात्मक प्रतिबिंब उमटले. पण तरीदेखील नंतरच्या काही तासांमध्ये इराणकडून सौदी अरेबिया, तसेच कुवेतवर आणि इस्रायलकडून इराणवर हल्ले झाले. त्यानंतरही शस्त्रसंधीच्या अंमलबजावणीसाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र लेबनॉनमधील हेझबोला संघटनेच्या विरोधात इस्रायली हल्ले दिवसभरात तीव्र झाले. त्यामुळे इराणनेही प्रत्युत्तराचा निर्धार व्यक्त केला.

तसेच होर्मुझ सामुद्रधुनीचीही नाकेबंदी केल्याने शस्त्रसंधी आणि संभाव्य युद्धसमाप्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ट्रम्प यांनी शस्त्रसंधी जाहीर करताना इस्रायलकडूनही हल्ले थांबवले जातील, असे म्हटले होते. इस्रायलने तरीदेखील लेबनॉनवर हल्ले सुरू ठेवून शस्त्रसंधीमध्ये खोडा घातला.

पाकिस्तानची यशस्वी शिष्टाई

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी संस्कृती बेचिराख करण्याची धमकी दिल्यानंतर युद्धाची तीव्रता वाढण्याची चिंता व्यक्त केली जात होती. मात्र पाकिस्तानच्या मध्यस्थीने दोन आठवड्यांचा युद्धविराम झाला आहे. पाकिस्तानने दोन्ही देशांना शुक्रवारी (१० एप्रिल) इस्लामाबादमध्ये चर्चेसाठी आमंत्रण दिले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने पाठविलेला १० मुद्द्यांचा प्रस्ताव प्राप्त झाल्याचे सांगून त्यावर वाटाघाटी शक्य असल्याचे म्हटले आहे. इराणच्या या मुद्द्यांच्या आधारावरच त्यांच्याशी चर्चा केली जाईल, असे ट्रम्प म्हणाले. अमेरिकेच्या या भूमिकेवर इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा मंडळाने अमेरिकेला इराणचे १० मुद्दे तत्त्वत: मान्य असल्याचे म्हटले आहे. यामध्ये इराणवरील सर्व निर्बंध उठवणे, इराणमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई देणे आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळविण्याचा समावेश आहे.

जगाला भुर्दंड?

इराणने शस्त्रसंधी प्रस्तावात एक तरतूद ठेवली आहे. इराण आणि ओमानला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणार्‍या जहाजांना शुल्क आकारण्यास परवानगी असेल, अशी ही तरतूद असून याचा भुर्दंड जगाला बसणार आहे. ओमानने मात्र होर्मूझ सामुद्रधुनी ओलांडण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाऊ शकत नाही, अशी भूमिका घेतली.

शनिवारपासून पाकिस्तानमध्ये चर्चा

वॉशिंग्टन : इराणशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानला उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ जाणार आहे, अशी माहिती व्हाइट हाऊसच्या माध्यम सचिव कॅरोलिन लेविट यांनी दिली.

चर्चेची पहिली फेरी शनिवारी पार पडेल असे त्यांनी सांगितले. व्हान्स यांच्याबरोबरच्या शिष्टमंडळात अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जारेड कुश्नर यांचाही समावेश असेल. व्हान्स यांनी इराणच्या मुद्द्यावर सुरुवातीपासून महत्त्वाची भूमिका बजावली आहे असे लेविट म्हणाल्या. इराणी शिष्टमंडळाचे नेतृत्व पार्लमेंटचे अध्यक्ष मोहम्मद बाकेर कालिबाफ आणि परराष्ट्रमंत्री सईद अब्बास अराघची यांच्याकडे असेल.

शेअर बाजारात तेजीला उधाण

युद्धविरामाची घोषणा झाल्यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घडामोडीचे वर्णन जागतिक शांततेसाठी एक मोठा दिवस असे केल्याने त्याचे पडसाद देशांतर्गत भांडवली बाजरावर देखील उमटले. प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने २,९४६.३२ अंशांनी उसळी घेत ७७,५६२.९० पातळी गाठली. सत्रादरम्यान, ३,०१८.९६ अंशांची झेप घेतली होती. निफ्टी ८७३.७० अंशांनी उसळला आणि २३,९९७.३५ अंशांवर बंद झाला.

खनिज तेलाचा दिलासा

होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याची अट इराणने मान्य केल्याने ऊर्जा पुरवठ्यातील व्यत्ययाबाबतच्या चिंता काहीशा कमी झाल्या आहेत. त्यापरिणामी ‘ब्रेंट क्रूड’च्या किमती १३.८९ टक्क्यांनी घसरून ९४.०९ अमेरिकी डॉलर प्रतिपिंपापर्यंत नरमल्या आहेत.