Iran Dirty Bomb Threat: अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आता चौथ्या आठवड्यात पोहोचले आहे. संघर्ष थांबण्याचे अद्याप कोणतेही संकेत दिसत नाहीत. अमेरिक – इस्रायलकडून होणाऱ्या भीषण हल्ल्यांचा सामना इराण करत आहे. संघर्ष सुरु झाल्यानंतर इराणने पहिल्यांदा चार हजार किलोमीटरचा पल्ला गाठणारे इस्रायलवर डागले. पण, इराण या युद्धात डर्टी बॉम्बचा वापर करु शकते का? डर्टी बॉम्ब म्हणजे काय? त्याचा दुष्परिणाम काय असतात? याबाबत आता आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चा होऊ लागला आहे.

इराणकडे अण्वस्त्रासारखा दुसरा पर्याय?

इराणवर गेल्या तीन आठवड्यांपासून अमिरिका आणि इस्रायलकडून हल्ला केला जात आहे. यात इराणमधील लष्करी तळ, अण्वस्त्र चाचणी तळ याठिकाणी गॅस ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे. इराणकडे अण्वस्त्र नाही पण, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र असल्याचा दावा केला जातो. याशिवाय त्यांच्याकडे डर्टी बॉम्बचा एक पर्याय उपलब्ध असल्याचा दावा केला जातो. इराण गरज पडल्यास या पर्यायाचा वापर करु शकते, असे सांगितले जाते.

काय आहे डर्टी बॉम्ब?

अण्वस्त्राएवढा प्रलंयकारी नसला तरी डर्टी बॉम्ब मोठ्या प्रमाणावर नुकसान करु शकतो, असे या विषयातील तज्ज्ञ सांगतात. डर्टी बॉम्बला किरणोत्सर्गी पदार्थ पसरवणारे स्फोटक म्हणून देखील ओळखले जाते. याचा वापर प्रामुख्याने शत्रू राष्ट्राचा सभोवतालचा परिसर दूषित करण्यासाठी केला जातो. अणुबॉम्बपेक्षा खूपच कमी विनाशकारी असला तरी, यामुळे शेतजमीन आणि पाण्याचे स्रोत प्रदूषित होऊ शकतात. याच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना कर्करोग आणि तीव्र किरणोत्सर्ग सिंड्रोम यांसारख्या आजारांचा धोका असतो.

कशी असते रचना?

यूएस न्यूक्लियर रेग्युलेटरी कमिशननुसार, डर्टी बॉम्बमध्ये डायनामाइटसारख्या पारंपरिक स्फोटकासोबत पावडर, गोळ्या किंवा इतर स्रोतांच्या स्वरूपातील किरणोत्सर्गी पदार्थ एकत्र केलेले असतात. या बॉम्बच्या स्फोटानंतर किरणोत्सर्गी पदार्थ परिसरात पसरतो, ज्यामुळे प्रदूषण होते. यात भीषण स्फोटाचा धोका नसला तरी यामुळे होणाऱ्या प्रदुषणाचा धोका उद्भवतो.

आरोग्याचे धोके काय?

किरणोत्सर्गी धूळ श्वासावाटे शरीरात गेल्यास आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. जास्त संपर्कामुळे तीव्र किरणोत्सर्ग सिंड्रोम (ARS) होऊ शकतो. अस्थिमज्जा, पचनसंस्था आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीला यामुळे मोठे नुकसान पोहोचते, परिणामी संसर्ग, अंतर्गत रक्तस्राव आणि अवयव निकामी होण्याची शक्यता अधिक असते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने रक्ताचा कर्करोगासह इतर कर्करोग, हृदयरोग आणि मोतीबिंदूचा धोका वाढू शकतो.

इराण डर्टी बॉम्ब तयार करु शकते का?

महत्वाचा मुद्दा म्हणजे इराण डर्टी बॉम्ब तयार करु शकत का? असा प्रश्न उपस्थित केला जातो. याबाबत या विषयातील तज्ज्ञांनी मांडलेल्या मतानुसार इराण डर्टी बॉम्ब तयार करु शकतो, असे सांगितले जाते. यूएस न्यूक्लियर रेग्युलेटरी कमिशननुसार, बाजारात सहज उपलब्ध असलेल्या किरणोत्सर्गी पदार्थांपासून डर्टी बॉम्ब तयार करता येऊ शकतात. यासाठी सीझियम-१३७ (रेडिओथेरपीमध्ये वापरले जाते), अमेरिसियम-२४१ (स्मोक डिटेक्टरमध्ये वापरले जाते), आणि कोबाल्ट-६० (शस्त्रक्रियेची उपकरणे निर्जंतुक करण्यासाठी वापरले जाते), इत्यादींचा वापर केला जातो.

तर युद्ध भीषण वळण घेईल

तज्ज्ञांच्या मतानुसार इराण डर्टी बॉम्बचा अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध वापर करण्याची शक्यता फारच कमी आहे. इराणने तसा वापर केल्यास युद्ध भीषण वळण घेऊ शकते, तसेच मध्यपूर्वेत याचे तीव्र पडसाद उमटू शकतात. तसेच, रशिया, चीन यासारखे देश देखील यावर नाराजी व्यक्त करु शकतात. तसेच, इराणकडे खरचं डर्टी बॉम्ब आहे की नाही याबाबत देखील शंका कुशंका उपस्थित केल्या जातात.