SSC HSC Board Exams Postponed due to Iran Israel War impact : मध्य पूर्वेतील काही भागांमधील सध्याच्या परिस्थितीचा हवाला देत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने रविवारी बहरीन, इराण, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि युएई मध्ये २ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नवीन तारखा नंतर जाहीर केल्या जातील.
विद्यार्थी आणि शाळांना कळविण्यात येते की मध्य पूर्वेतील काही भागांमधील (बहरीन, इराण, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि युएई) सध्याच्या परिस्थितीमुळे बोर्डाने सोमवार, २ मार्च रोजी होणाऱ्या मध्य पूर्व प्रदेशात दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, असं केंद्रीय मंडळाने एका निवेदनात म्हटलं आहे.
बोर्ड मंगळवार, ३ मार्च रोजी परिस्थितीचा आढावा घेईल आणि ५ मार्चपासून होणाऱ्या परीक्षांबाबत योग्य निर्णय घेईल. तसंच, सीबीएसईने सर्व विद्यार्थ्यांना अपडेट्ससाठी त्यांच्या शाळांच्या संपर्कात राहण्याचा आणि अधिकृत घोषणांचे काळजीपूर्वक पालन करण्याचा सल्ला दिला आहे.
सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर इराणने अमेरिका आणि इस्रायलवर हल्ले सुरू केले. या प्रदेशातील प्रमुख अमेरिकन लष्करी तळांवर हल्ला केला आणि इस्रायली स्थळांना लक्ष्य केले.
डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला पुन्हा मोठा इशारा
इराणच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देत पुन्हा अतिशय शक्तिशाली हल्ला करण्याची धमकी इराणला दिली आहे. त्यामुळे आता हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच ट्रुथ सोशलवर एक पोस्ट केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, “इराणने नुकतंच म्हटलं की ते आज खूप मोठा हल्ला करणार आहेत. जो त्यांनी (इस्रायल-अमेरिकेने) यापूर्वी कधीही पाहिला नसेल. मात्र, त्यांनी (इराणने) असं करून नये. कारण जर इराणने असं केलं तर आपण त्यांच्यावर अतिशय शक्तिशाली हल्ला करू, ज्याची पूर्वी इराणने कधीही कल्पना केली नसेल”, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
