Iran presents a fresh peace proposal to the US: गेल्या दोन महिन्यांपासून आखातात पेटलेलं युद्ध आता थांबण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. पाकिस्तानमध्ये चालू असलेल्या चर्चेच्या फेऱ्यांमध्ये फारसं काही हाती लागत नसतानाच इराणनं अमेरिकेला पाकिस्तानमधील मध्यस्थांकरवी युद्धसमाप्तीसाठी नवा प्रस्ताव सादर केला असून त्यावर आता अमेरिकेकडून नेमकी काय भूमिका घेतली जाते? याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे. पाकिस्तानमधील नुकतीच झालेली चर्चा अपयशी ठरल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आता इराणला गरज असेल तर ते चर्चेसाठी पुढाकार घेतील अशी भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर इराणनं उचललेलं पाऊल युद्धसमाप्तीच्या दिशेनं महत्त्वाचं ठरण्याची शक्यता आहे.

युद्धसमाप्तीसाठी काय आहे इराणचा प्रस्ताव?

इराणकडून अमेरिकेला सादर करण्यात आलेल्या नव्या प्रस्तावामध्ये होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) जहाजांच्या दळणवळणासाठी पुन्हा खुली करण्याचा मुद्दा मांडण्यात आला आहे. अमेरिकेतील स्थानिक वृत्तसंस्था Axios नं दिलेल्या वृत्तानुसार, इराणनं होमुझची सामुद्रधुनी तातडीने खुली करण्याचा प्रस्ताव अमेरिकेला सादर केला आहे. इराणच्या आण्विक कार्यक्रमाबाबतची चर्चा नंतर होईल, पण सध्या होर्मुझ खुली करून आखातात चालू असलेलं युद्ध तातडीने समाप्त केलं जावं, असा प्रस्ताव इराणनं ठेवला आहे.

अमेरिका अण्वस्त्राबाबतच्या भूमिकेवर ठाम

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर इराणनं हा प्रस्ताव सादर केला असला, तरी त्यातील आण्विक कार्यक्रमासंदर्भातील तरतुदीवर अमेरिकेची सहमती होणं कठीण दिसत आहे. आता इराणला गरज असेल तर त्यांनी शांतीप्रस्तावासाठी पुढाकार घ्यावा, असं सांगतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणकडे कधीच अण्वस्त्र असू नये, या आपल्या भूमिकेचा ठामपणे पुनरुच्चार केला आहे. त्यामुळे या मुद्द्यावर पुन्हा एकदा शांतीप्रस्तावाच्या प्रक्रियेमध्ये आडकाठी येण्याची शक्यता आहे.

‘युद्धविराम वाढवा किंवा युद्धबंदी जाहीर करा’

समोर आलेल्या माहितीनुसार, इराणनं दिलेल्या प्रस्तावात अमेरिकेने सर्वात आधी होर्मुझ सामुद्रधुनी व्यापारासाठी खुली करण्याचा मुद्दा मांडण्यात आला आहे. हे झाल्यानंतरच इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत चर्चा होऊ शकेल, अशी भूमिका इराणनं घेतली आहे. अमेरिकेनं एकतर युद्धविराम वाढवावा किंवा कायमस्वरूपी युद्धबंदी जाहीर करावी, त्यानंतर पुढच्या टप्प्यावर अणुकार्यक्रमावर चर्चा करू, असं इराणनं आपल्या प्रस्तावात नमूद केलं आहे. दरम्यान, अमेरिकेनं इराणकडे युरेनियमचा साठा हस्तांतरीत करण्याची मागणी केल्यानंतर त्यावर नेमकी काय भूमिका घ्यावी, याबाबत इराणच्या उच्चपदस्थ नेत्यांमध्ये एकमत होऊ शकलेलं नसल्याचं इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी दोन दिवसांपूर्वी नमूद केलं होतं. त्यामुळे या मुद्द्यावर नेमका काय तोडगा काढला जाणार? याकडे जगभरातल्या देशांचं लक्ष लागलेलं आहे.