Iran Israel War news regarding US military intervention and Iran’s aggressive counter-response : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. यादरम्यान अमेरिका जमिनीवरून हल्ला करण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाच, इराणकडून अमेरिकेचे लष्करी तळ असलेल्या शेजारच्या आखाती देशांवर हल्ले केले जात आहेत. यादरम्यान इराणने देशावर आक्रमण करणाऱ्यांचे पाय कापून टाकले जातील असा इशारा दिला आहे.

आपल्या (इराणच्या) भूमीवर होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी इराण सज्ज आहे, असे विधान इराणच्या एका वरिष्ठ लष्करी प्रवक्त्याने केले आहे. इराणची सरकारी वृत्तवाहिनी प्रेस टीव्हीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. प्रेस टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, खातम अल-अन्बिया मुख्यालयाचे प्रवक्ते इब्राहिम झोल्फाघरी (Ebrahim Zolfaghari) म्हणाले की, “इराणचे सशस्त्र दल देशावर आक्रमण करणाऱ्या कोणत्याही आक्रमकाचे पाय कापून टाकेल.”

तसेच या रिपोर्टमध्ये, अमेरिकेने जमिनीवरून हल्ला केला तर इराणच्या मदतीसाठी रशियन चेचेन तुकड्या तैनात केली जाऊ शकते असेही म्हटले आहे. असे झाले तर पश्चिम आशियामधील हा संघर्ष अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे.

यादरम्यान राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत. अमेरिका एकीकडे सार्वजनिक स्तरावर डिप्लोमसीचे संकेत देत आहे, तर दुसरीकडे लष्करी मोहिमेची योजना आखत असल्याचा आरोप इराणच्या नेतृत्वाकडून केला जात आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या मुद्द्यावर होत असलेल्या विविध घडामोडींमुळे या संपूर्ण प्रकरणातील गुंतागुंत जास्तच वाढली आहे. इराणच्या संसदेत या जागतिक तेल पुरवठ्यासाठी महत्त्वाच्या सागरी मार्गावरील नियंत्रण आणखी घट्ट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

इराणने या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझची सामुद्रधुनी बंद ठेवल्याने त्याचा परिणाम जगभरातील ऊर्जा पुरवठ्यावर होताना दिसत आहे. त्यामुळे हा जलवाहतुकीचा मार्ग खुला केला जात नाही तोवर युद्ध समाप्त होणार नाही, असा पवित्रा घेतलेल्या अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आपला निर्णय बदलल्याचे संकेत आहेत.

‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले आहे की, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिली तरीही ते इराणविरुद्धची लष्करी मोहीम थांबवण्यास तयार आहेत. या रिपोर्टनुसार, ट्रम्प हे आधी युद्ध संपवण्याचा आणि सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याचा विचार नंतर करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी दुसरा पर्याय म्हणजे, हा सागरी मार्ग पुन्हा खुला करण्यासाठी आखाती देश आणि नाटो (NATO) सह मित्रराष्ट्रांना पुढाकार घेण्यास विनंती करणार आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यासाठीच्या लष्करी योजनांचा अभ्यास केला जात आहे, परंतु सध्या ते राष्ट्राध्यक्षांच्या प्राधान्यक्रमात नाही. अमेरिकेच्या अंदाजानुसार, अशी मोहीम पूर्ण करण्यासाठी चार ते सहा आठवडे लागू शकतात.