ब्रसेल्स : हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर विविध युरोपीय देशांनी आपत्कालीन बैठका आयोजित केल्या. पश्चिम आशियातील आपापल्या नागरिकांचे संरक्षण करण्यावर त्यामध्ये भर देण्यात आला. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल माक्राँ यांनी सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावण्याचे आवाहन केले. जर्मनी आणि ब्रिटनमध्येही या प्रकारच्या बैठका आयोजित केल्या आहेत. इराणच्या जनतेला मुक्तपणे आपले भवितव्य घडवता आले पाहिजे, असे ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर म्हणाले.
युद्ध पसरण्याचा धोका पाहता, पश्चिम आशियातून युरोपीय महासंघाच्या काही कर्मचार्यांना माघारी बोलावले जात आहे. तसेच परिस्थिती हाताळण्याबद्दल नेते समन्वय साधण्याचे नियोजन आखत आहेत. युरोपीय नेत्यांचा इराणच्या अणुकार्यक्रमाला आणि निदर्शकांविरोधात केलेल्या कठोर कारवाईला ठाम विरोध आहे. त्याचवेळी अमेरिकेने केलेली एकतर्फी लष्करी कारवाई त्यांना फारशी मान्य नाही. यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचे नुकसान होण्याचा आणि संघर्ष चिघळण्याचा धोका असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अमेरिकेने युरोपातील आपल्या मित्र देशांना या हल्ल्यांची कोणतीही पूर्वसूचना दिली होती का हे अद्याप स्पष्ट नाही. आपल्याला शनिवारी सकाळी कळवण्यात आले, असे जर्मन सरकारने स्पष्ट केले. तर काहीतरी घडणार आहे, हे फ्रान्सला माहीत होते, पण कधी हे माहीत नव्हते, असे त्यांच्या संरक्षण उपमंत्री ॲलिस रुफो म्हणाल्या.
रशियाचा इराणला पाठिंबा
मॉस्को : अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या या हल्ल्यांचा रशियाने निषेध केला आहे. एका सार्वभौम देशावर अकारण आणि पूर्वनियोजित हल्ला केला गेला असल्याची टीका रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली. या हल्ल्यासाठी करण्यात आलेल्या लष्करी, राजकीय आणि प्रचाराची तयारी पाहता हा हल्ला पूर्वनियोजित होता यात काही शंका नाही. यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्यांचे मूलभूत तत्व आणि नियमांचे उल्लंघन झाले आहे, असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. राजकीय आणि मुत्सद्देगिरीने यातून मार्ग काढावा असेही रशियाने सुचवले आहे. अमेरिकेचा मित्र देश असलेल्या पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी इराणवरील हल्ल्यांचा निषेध केला.
अन्य देशांच्या प्रतिक्रिया
’ इराणने संयुक्त अरब अमिराती, बहरीन, कतार, कुवेत आणि जॉर्डन या देशांवर केलेल्या हल्ल्यांचा सौदी अरेबियाने निषेध केला. हा हल्ला त्या देशांच्या सार्वभौमत्वावर असल्याचे सौदीने म्हटले आहे. इराणच्या हल्ल्यांमुळे प्रादेशिक स्थिरता आणि सुरक्षेला धोका निर्माण झाला असून आंतरराष्ट्रीय समुदायाने त्यांना रोखावे असे आवाहन सौदीने केले आहे.
’ इराणच्या हल्ल्यांची दुसरी फेरी यशस्वीपणे परतवून लावल्याचे कतारच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले. तर परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्यांचा निषेध केला. कतारने नेहमी इराणबरोबर चर्चा करण्याची भूमिका घेतल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने नमूद केले.
’ इराणने अमेरिकेच्या लढाऊ जहाजावर केलेल्या हल्ल्याचा बहारीनने निषेध केला आहे. बहारीनचे अमेरिकेतील राजदूत अब्दाल्ला अल-खालिफा यांनी सांगितले की, हे हल्ले सार्वभौमत्त्वाचे थेट उल्लंघन आहे. बहारीनमध्ये अमेरिकी नौदलाच्या पाचव्या ताफ्याचे मुख्यालय आहे. कुवेतमध्ये अमेरिका आर्मी सेंट्रलचे केंद्र आहे.
’ इराण जागतिक सुरक्षेला धोका असल्याची टीका युरोपीय महासंघाने केली आहे. पश्चिम आशियामधील संघर्ष धोकादायक आहे, असे मत ईयूच्या परराष्ट्र धोरण विभागाच्या प्रमुख काया कल्लास यांनी व्यक्त केले. शांततेसाठी वाटाघाटी करण्यासाठी इस्रायल आणि अरबी अधिकार्यांशी चर्चा करत असल्याचे त्या म्हणाल्या.
ट्रम्प यांचा इशारा
हा हल्ला ‘अतिशय मोठा’ असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर प्रसिद्ध केलेल्या ध्वनिचित्रिफतीच्या माध्यमातून जाहीर केले आणि इराणी सरकारला शरण येण्यास सांगितले. तसेच त्यांनी इराणी जनतेला ‘स्वत:चे भवितव्य स्वत:च्या हातात घेण्याचे’ आवाहन केले आहे. ‘इराणपासून आपल्या देशाला आणि जनतेला धोका होता, त्यामुळे हा हल्ला केला,’ असे कारण अमेरिका आणि इस्रायलने जाहीर केले. ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर आपली भूमिका मांडली. ते इराणी जनतेला उद्देशून म्हणाले, ‘‘१९७९पासून तुम्ही ही राजवट सहन करत आहात, आता तुम्हाला स्वत:चे सरकार स्थापन करण्याची संधी मिळेल. तुम्ही नेहमीच अमेरिकेची मदत मागितली, पण तुम्हाला ती मिळाली नाही.’’ इराणने अण्वस्त्र बाळगू नयेत याची खबरदारी घेणे हे अमेरिकेचे ध्येय आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले. इराणी नौदलाचा नाश करणे हे आपले ध्येय आहे, तसेच पश्चिम आशियामध्ये इराणशी सहानुभूत बाळगणार्यांनाही नष्ट करण्याचा इरादा त्यांनी जाहीर केला. इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ने शस्त्र टाकून शरण यावे, त्यांना अभय दिले जाईल अन्यथा त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागेल अशी धमकी ट्रम्प यांनी दिली.
दुसरीकडे, ‘‘इराणच्या अणुकार्यक्रमामुळे आमच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला असून आम्ही आत्मसंरक्षणार्थ हल्ला केला,’’ असा दावा इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी केला. तसेच अयातुल्ला अली खामेनी आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांना आम्ही लक्ष्य करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे या युद्धात इराणचा क्षेपणास्त्र आणि अणुकार्यक्रम पूर्णपणे नष्ट करून धार्मिक, राजकीय आणि लष्करी नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी जून २०२५मध्ये इस्रायल आणि अमेरिकेने १२ दिवस इराणवर हल्ले केले होते. त्यावेळी प्रामुख्याने इराणच्या अणुभट्ट्या असलेल्या केंद्रावर हल्ले चढवण्यात आले होते.
खामेनींचा थांगपत्ता नाही
इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यापूर्वी अनेक दिवसांपासून खामेनी जनतेसमोर आलेले नाहीत. जूनमधील हल्ल्यांनंतर त्यांना तेहरानमधून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचे मानले जाते.
हल्ले सुरूच राहण्याची शक्यता
या लष्करी कारवाईची एका व्यक्तीने ‘एपी’ला सांगितले की, शनिवारी सुरू करण्यात आलेल्या हल्ल्यांची अनेक महिन्यांपासून तयारी केली जात होती आणि त्याचा बारकाईने समन्वय राखण्यात आला होता. हे हल्ले अनेक दिवस सुरू राहतील, असेही संबंधित व्यक्तीने सांगितले.
भारतीयांना खबरदारीचा सल्ला
हल्ल्यांनंतर काही तासांतच, आखाती देशातील भारतीय दूतावासांनी तिथे राहणार्या भारतीयांना जास्तीत जास्त खबरदारी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. स्थानिक सरकारांद्वारे जारी करण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असेही दूतावासांकडून सांगण्यात आले. अबूधाबी, रियाध, जेद्दा, बहारीन, रामल्ला अशा विविध ठिकाणच्या दूतावासाने भारतीयांना अनावश्यक प्रवास टाळण्यास, योग्य काळजी घेण्यास, सतर्क राहण्यास आणि यूएई सरकार व दूतावासाने जारी केलेल्या सुरक्षेविषयक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. इस्रायलमधील भारतीय दूतावासानेही तेथील भारतीयांना संपर्क साधण्यास आणि सुरक्षेच्या कारणास्तव स्वत:ची नोंद करण्यास सांगितले आहे. दरम्यान, नवी दिल्लीत नागरी हवाई वाहतूकमंत्री के राममोहन नायडू यांनी बोलावलेल्या बैठकीत पश्चिम आशियातील संघर्षाचा आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर होणार्या संभाव्य परिणामाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. त्याबरोबरच भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय), नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए), विमान कंपन्या आणि प्रमुख विमानतळ कंपन्या यांचे अधिकारीही बैठकीत उपस्थित होते.
