एपी, दुबई
युद्ध सुरू होऊन तीन आठवडे झाल्यानंतरही आपण अजूनही क्षेपणास्त्रांची निर्मिती करत आहोत, असे इराणने शुक्रवारी स्पष्ट केले. तसेच जागतिक पर्यटन स्थळांना लक्ष्य करण्याची धमकीही इराणने दिली. दरम्यान, इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड’चे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल अली मोहंमद नैनी यांचा अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
“जगभरातील उद्याने, मनोरंजनाची ठिकाणे आणि पर्यटनाची स्थळे इराणच्या शत्रूंसाठी सुरक्षित राहणार नाहीत,” अशी धमकी इराणचे वरिष्ठ लष्करी प्रवक्ते जनरल अबोलफजल शेकारची यांनी दिली. त्यामुळे इराण दबाव रणनीती म्हणून पश्चिम आशियाशिवाय अन्य देशांमध्ये अतिरेक्यांमार्फत हल्ले घडवून आणणार का, अशी चिंता निर्माण झाली आहे. मृत्यूपूर्वी काहीच तास आधी ब्रिगेडियर जनरल अली मोहंमद नैनी यांनी अमेरिकेला पर्शियन आखातात नौका पाठविण्याची हिंमत करावी, असे आव्हान दिले होते. दुसरीकडे, अमेरिका आणखी तीन युद्धनौका आणि अडीच हजारांपेक्षा अधिक नौसेनिक तैनात करत असल्याची माहिती त्या देशाच्या अधिकाऱ्यांनी नाव गुप्त ठेवण्याच्या अटींवर दिली.
पश्चिम आशियातील मुस्लीम देशांमध्ये शुक्रवारी ईद-उल-फित्रचा सण साजरा करण्यात आला, इराणमध्ये ईदच्या जोडीला पर्शियन नूतन वर्ष नवरोजही साजरा करण्यात आला. याच दरम्यान, इराणने इस्रायलवर आणि शेजारील अरब देशांतील ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले सुरूच ठेवले. युद्धामुळे जेरुसलेम येथील अल-अक्सा मशीद प्रार्थनांसाठी बंद ठेवण्यात आली होती. इराणने या शहराच्या दिशेनेही क्षेपणास्त्र हल्ला केला, त्यामध्ये जुन्या शहराचे काही प्रमाणात नुकसान झाले.
इराणच्या सैन्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा केला असला तरी, प्रत्यक्षात त्यांचे किती नुकसान झाले आहे याची फारशी माहिती मिळत नाही. दुसरीकडे, इराणने तेलपुरवठा बंद पाडणे आणि जागतिक अर्थव्यवस्था कोंडीत पकडणे यासारख्या जगाला धक्के देणाऱ्या रणनीती कायम ठेवल्या आहेत.
