Ali Larijani death impacts Iran Israel war as Tehran issues a fierce warning to America छ अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष काही थांबण्याची चिन्हे दिसून येत नाहीयेत. यादरम्यान इराणच्या सर्वाच वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याच्या हत्येनंतरही इराणचा लढा सुरूच राहिल, असे इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची बुधवारी म्हणाले आहेत. “एका व्यक्तीच्या असण्याने किंवा नसण्याने इराणच्या राजकीय आणि आर्थिक रचनेत कोणताही परिणाम होत नाही,” असे अराघची कतारची वृत्तवाहिनी अल जझीराशी बोलताना म्हणाले.

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध तिसऱ्या आठवड्यात पोहचले असून इराणवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या नॅशनल सेक्युरिटी कौन्सिलचे प्रमुख अली लारिजानी यांचा मृत्यू झाला आहे. यानंतर इरणाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हे विधान केले आहे. इराणच्या संरक्षण रणनीतीचे श्रेय हे लारिजानी यांना दिले जाते. दरम्यान तेहरानजवळील त्यांच्या मुलीच्या घरावर झालेल्या हवाई हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात त्यांचा मुलगा, डेप्युटी आणि अंगरक्षक यांचाही मृत्यू झाला.

अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी केलेल्या लष्करी पहिल्याच दिवशी माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता. याचा दाखला देत अराघची म्हणाले, “अगदी (सर्वोच्च) नेते शहीद झाले, तरीही यंत्रणेने काम सुरू ठेवले.”

दोहा येथील वृत्तवाहिनीशी बोलताना अराघची यांनी मध्येपूर्वेतील संघर्षासाठी अमेरिकेला जबाबदार धरले आहे. तसेच त्यांनी मानवी आणि आर्थिक हानीसाठी अमेरिकेला जबाबदार धरले पाहिजे असेही ते म्हणाले.

अली लारिजानी यांचा मृत्यू झाल्याचे इराणकडून कबुली देण्यात आली आहे. इस्रायलने मंगळवारी रात्री केलेल्या हवाई हल्ल्यात दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. सुरुवातीला हा दावा फेटाळल्यानंतर आता इराणने लारिजानी यांच्यासह जनरल गुलाम रझा सोलेमनी यांचाही मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अयातुल्ला यांच्या मृत्यूनंतर हा दुसरा सर्वात मोठा झटका मानला जात आहे.

इराणच्या उच्च स्तरावरील सुरक्षा अधिकारी आणि रिव्होल्युशनरी गार्डचे बसिज गटाचे प्रमुख मारले गेले असल्याचा दावा इस्रायलने मंगळवारी केला होता. यात इराणचे सुरक्षा अधिकारी अली लारिजानी आणि जनरल गुलाम रझा सोलेमनी यांचा मृत्यू झाला आहे. इराणकडून याची अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे.

मोजतबा खामेनी यांना शोधून ठार करणार – इस्रायल

सुरक्षा अधिकाऱ्यांना ठार केल्यानंतर इस्रायलने नवनियुक्त सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांना देखील शोधून ठार करणार असल्याचे म्हटले आहे. “मोजताबा यांच्याबद्दल आम्हाला माहिती नाही. त्यांना आम्ही ऐकले नाही, पाहिले नाही. पण, एक गोष्ट सांगतो, आम्ही त्यांनी शोधून काढू आणि ठार करु”, असे इस्रायली लष्कराचे प्रवक्ते इफी डेफरीन यांनी म्हटले आहे.