अमेरिकेच्या नौदलाच्या एका जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडण्याचा प्रयत्न केला असता, इराणने त्यावर दोन क्षेपणास्त्रे डागली असल्याची माहिती इराणची सेमी-ऑफिशियल वृत्तसंस्था फार्सने दिली आहे.

“इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या नौदलाने दिलेला इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने, अमेरिकन जहाजाला लक्ष्य करत क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले,” असे फार्स वृत्तसंस्थेने म्हटले .

स्थानिक सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या या वृत्तात असेही म्हटले होते की, “क्षेपणास्त्रे धडकल्याने हे जहाजाला आपला प्रवास पुढे सुरू ठेवता आला नाही आणि त्याला माघार घेत पळ काढावा लागला.”

दरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ इराणच्या नौदलाने अमेरिकन नौदलाच्या जहाजावर हल्ला केला नसल्याचे एका अमेरिकन अधिकाऱ्याने द जेरुसलेम पोस्टशी बोलताना सांगितले.

अमेरिकन सेंट्रल कमांडने (CENTCOM) सोमवारी दुपारी एक्सवर पोस्ट करत अमेरिकेच्या कोणत्याही जहाजाला लक्ष्य करण्यात आलेले नसल्याचे स्पष्ट केले आहे. अमेरिकन सैन्य सध्या प्रोजेक्ट फ्रीडमला पाठिंबा देत असून, इराणच्या बंदरांवरील सागरी नाकेबंदीची कडक अंमलबजावणी करत आहे, असेही सेंटकॉमने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सशी संबंधित फार्स वृत्तसंस्थेने होर्मुझ सामुद्रधुनीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या जास्क बंदराजवळ अमेरिकेच्या एका युद्धनौकेवर दोन क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा केला होता. या हल्ल्यामुळे अमेरिकन जहाजाला आपला मार्ग बदलावा लागला आणि माघार घ्यावी लागल्याचे, या वृत्तात म्हटले होते. मात्र, अमेरिकेने दावा अधिकृतपणे फेटाळून लावला आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये इराणकडून वारंवार या प्रदेशातीस अनेक अमेरिकन नौदल जहाजांना लक्ष्य केल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्यामध्ये मार्चमध्ये युएसएस अब्राहम लिंकन एअरक्राफ्ट कॅरिअरवर लक्ष्य करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.

मात्र सेंटकॉमने एक्सवर एक निवेदन जारी करत हा दावा खोटा असल्याचे आणि क्षेपणास्त्र युद्धनौकेच्या जवळपासही आले नाहीत असे स्पष्ट केले होते.