Mojtaba Khamenei On Iran US War : गेल्या एका महिन्यांपासून सुरू असलेलं अमेरिका-इराण युद्ध ८ एप्रिल रोजी तात्पुरतं थांबलं असलं तरी या युद्धाबाबत अद्यापही कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. दोन्ही देशांत शांतता करारासाठी पाकिस्तानच्या माध्यमातून चर्चा सुरू आहेत. या चर्चेची दुसरी फेरी देखील लवकरच सुरू होणार असल्याची माहिती सांगितली जात आहे. मात्र, एककीडे शांतता चर्चा आणि दुसरीकडे दोन्ही देशातील तणाव आणखी वाढत असल्याचं चित्र दिसत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वेगवेगळ्या दाव्यानंतर इराणने शुक्रवारी खुली केलेली होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) अवघ्या २४ तासांत पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी अमेरिकेला पुन्हा एकदा मोठा इशारा दिला आहे. ‘आम्ही आमच्या शत्रूंचा पराभव करण्यास सज्ज आहोत’, असं मोजतबा खामेनी यांनी म्हटलं आहे.
इराणने काय इशारा दिला?
इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलवरून अमेरिका आणि इस्रायलला इशारा दिला आहे. ‘इराणचं नौदल आपल्या शत्रूंचा दारुण पराभव करण्यास सज्ज आहे’, असं मोजतबा खामेनी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या इशाऱ्यामुळे आता पुन्हा एकदा युद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इराणकडून अमेरिकेवर ‘वचनभंग’ आणि ‘नाकेबंदी’चा आरोप
इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने एका निवेदनात म्हटलं आहे की, “अमेरिकेने इराणच्या बंदरांकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या जहाजांची नाकेबंदी अद्याप हटवलेली नाही. इराणने या कृतीला “समुद्री चाचेगिरी” असं संबोधलं आहे. ‘चाचेगिरी’ म्हणजे समुद्रात किंवा जलमार्गावर जहाजांचं अपहरण करणं, सशस्त्र दरोडा टाकणं किंवा खासगी फायद्यासाठी हिंसाचार करणं, त्यामुळे जोपर्यंत अमेरिका इराणच्या जहाजांना पूर्ण स्वातंत्र्य देत नाही, तोपर्यंत होर्मुझच्या सामुद्रधुनीची स्थिती पूर्ववत (बंद) राहील”, असा इशारा इराणने दिला.
ट्रम्प यांची आक्रमक भूमिका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं की, इराणशी संबंधित व्यवहार १०० टक्के पूर्ण होत नाही, तोपर्यंत अमेरिकन नौदलाची नाकेबंदी पूर्ण ताकदीने सुरूच राहील. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करत म्हटलं की, “होर्मुझची सामुद्रधुनी व्यापारासाठी खुली आहे. परंतु इराणच्या बाबतीत अमेरिकेची नाकेबंदी तोपर्यंत सुरू राहील जोपर्यंत आमचा इराणसोबतचा करार पूर्ण होत नाही.”
