Pakistan Iran US Talks : अमेरिका-इराणमधील युद्धाबाबत अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. अमेरिका-इराणमध्ये २८ फेब्रुवारीपासून युद्ध भडकलं होतं. त्यानंतर तब्बल एका महिन्यानंतर तात्पुरती युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. पण दोन्ही देशातील युद्ध पूर्णपणे संपलेलं नाही. दोन्ही देशांत शांतता करार व्हावा, यासाठी पाकिस्तानच्या माध्यमातून शांतता चर्चेसाठी प्रयत्न सुरू आहेत.
एकीकडे शांतता करारासाठी हालचाली सुरू असतानाच दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प वेगवेगळे वक्तव्य करत इराणला धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे इराण-अमेरिका यांच्यातील तणाव आणखी वाढत असल्याचं चित्र आहे. यातच अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच होर्मुझ सामुद्रधुनीत नाकेबंदीची घोषणा केली. अमेरिकेच्या या निर्णयाला इराणने तीव्र विरोध दर्शवलेला आहे.
यातच ‘इराण अणुबॉम्ब बनवण्याचं स्वप्न जोपर्यंत सोडत नाही, तोपर्यंत होर्मुझ सामुद्रधुनीतील नाकेबंदी सुरूच राहील’, असं अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे दोन्ही देशांतील तणाव नेमकी कधी कमी होईल? याकडे आता जगाचं लक्ष लागलेलं आहे.
या सर्व घडामोडी सुरू असतानाच अमेरिका आणि इराणधील रखडलेल्या वाटाघाटींच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान योग्य मध्यस्थी नसल्याचं मोठं वक्तव्य एका इराणी खासदारांनी केलं आहे. “करारासाठी पाकिस्तान योग्य ठिकाण नाही”, असा मुद्दाच इराणी खासदार इब्राहिम रझाई यांनी म्हटलं आहे. त्यामुळे इराण पाकिस्तानच्या मध्यस्थीच्या क्षमतेबाबत अविश्वास का दाखवत आहे? याबाबत आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
इराणी खासदार इब्राहिम रझाई यांनी अमेरिका आणि इराणधील वाटाघाटींमध्ये मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर गंभीर शंका व्यक्त केली आहे. इब्राहिम रझाई हे इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण आयोगाचे प्रवक्ते देखील आहेत. रझाई यांनी म्हटलं की, “मध्यस्थीसाठी आवश्यक असलेली विश्वासार्हता पाकिस्तानकडे नाही. पाकिस्तान चांगला मित्र आणि शेजारी आहे. पण योग्य मध्यस्थ नाही. कारण पाकिस्तान हा अमेरिकेच्या हितांशी जुळवून घेत आहे”, असं ते म्हणाले.

इराणी खासदारांनी काय आरोप केला?
“पाकिस्तान अमेरिकेवर उघडपणे टीका करणं टाळतो आणि अमेरिकेने लेबनॉन आणि इराणच्या मालमत्ता गोठवण्यासह आणखी काही वचनबद्धता पूर्ण केलेल्या नाहीत. असे अनेक उदाहरणे आहेत. मग हे मुद्दे पाकिस्तान समोर का आणत नाही? यामध्ये पाकिस्तान अपयशी ठरत आहे. खरं तर मध्यस्थ निष्पक्ष असला पाहिजे किंवा मध्यस्थ हा नेहमी एकाच बाजूला झुकणारा नसला पाहिजे, असं इब्राहिम रझाई यांनी म्हटलं आहे.

पीट हेगसेथ यांनी ‘होर्मुझ’मधील नाकेबंदीबाबत काय इशारा दिला?
अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी नुकतंच एक मोठं वक्तव्य केलं. ‘इराण अणुबॉम्ब बनवण्याचं स्वप्न जोपर्यंत सोडत नाही, तोपर्यंत होर्मुझ सामुद्रधुनीतील नाकेबंदी सुरूच राहणार’, असं पीट हेगसेथ यांनी म्हटलं आहे. “होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या इराणी सागरी जहाजांवर अमेरिकेने लादलेली नौदल नाकेबंदी अभेद्य आहे. जोपर्यंत आवश्यक असेल तोपर्यंत ही नाकेबंदी सुरूच राहणार आहे. जोपर्यंत इराण आपल्या अणुबॉम्ब बनवण्याच्या महत्त्वाकांक्षा सोडून देत नाही, तोपर्यंत अमेरिका दबाव कायम ठेवण्याचा मानस बाळगून आहे”, असं पीट हेगसेथ यांनी म्हटलं. दरम्यान, इराणी बंदरे आणि सागरी वाहतुकीवरील निर्बंधांचा संदर्भ देत पीट हेगसेथ यांनी म्हटलं की, “नियंत्रण आमच्या हातात आहे. ही नाकेबंदी आखाताच्या पलीकडे विस्तारत आहे. अमेरिकेची नाकेबंदी वाढत आहे आणि जागतिक होत आहे. अमेरिकेच्या नौदलाच्या परवानगीशिवाय होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जगात कुठेही कोणीही जहाजे प्रवास करत नाही.”
युद्धसमाप्तीच्या चर्चेसाठी ट्रम्प यांनी काय भूमिका मांडली?
“पश्चिम आशियातील युद्ध थांबवण्यासाठी आमच्याशी चर्चा करायची असेल तर इराणने आमच्याशी संपर्क साधावा,” असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी म्हटलं आहे. दरम्यान, याबाबत शुक्रवारी पाकिस्तानला पोहोचलेले इराणचे परराष्ट्रमंत्री सईद अब्बास अराघची यांनी शनिवारी पाकिस्तानी नेत्यांशी चर्चा केली. मात्र, अमेरिकी प्रतिनिधी पोहोचण्याच्या आधीच ते ओमानच्या दौऱ्यावर निघून गेले. त्यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकी शिष्टमंडळाचा पाकिस्तान दौरा रद्द करत असल्याचं जाहीर केलं होतं.

ओमानचा एक दिवसाचा दौरा आटोपून अराघची रविवारी पुन्हा पाकिस्तानला परतले. ते रशियाला जाण्यापूर्वी थोडावेळ पाकिस्तानला थांबल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेनं पाकिस्तानात तैनात केलेली सुरक्षा हटवली आहे. त्यामुळे अमेरिका-इराण चर्चेची पुढील फेरी पाकिस्तानात होण्याची शक्यता मावळली असल्याचं मानलं जात आहे.
