Alireza Tangsiri Killed Israel Strike: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचा आणखी एक मोठा अधिकारी ठार झाला आहे. इराणच्या नौदलाचे प्रमुख अलीरेझा तंगसिरी यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायली अधिकाऱ्यांनी केला आहे. इराणच्या शक्तिशाली इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या (IRGC) नौदल विभागाचे नेतृत्व करणारे तंगसिरी, बंदर अब्बास या शहरात झालेल्या हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त आहे. इराणने मात्र या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही.

होर्मुझ सामुद्रधुनीची जबाबदारी

होर्मुझची सामुद्रधुनी बंद करणे आणि येथील हालचालींवर देखरेख ठेवण्याची मोठी जबाबदारी अलीरेझा तंगसिरी यांच्यावर होती. या महत्त्वपूर्ण जलमार्गावरील इराणच्या नियंत्रणामुळे मध्य पूर्वेकडून होणाऱ्या तेल आणि वायूच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारिजानी यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता तंगसिरी यांचा मृत्यू झाल्याने इराणसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

अलीरेझा तंगसिरी कोण होते?

दक्षिण इराणच्या बुशेर प्रांतात जन्मलेल्या अलीरेझा तंगसिरी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या नौदलात भरती झाले होते. इराण – इराक युद्ध आणि १९८० चे अमेरिकेविरुद्धच्या युद्धात त्यांनी सहभाग घेतला होता, अशी माहिती आहे. बढती झाल्यानंतर बंदर अब्बास येथे त्यांची अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २०१० ते २०१८ दरम्यान त्यांनी सहाय्यक कमांडर म्हणून काम केले. त्यानंतर त्यांची प्रमुखपदी निवड केल्याचे समजते.

अनेक बड्या अधिकाऱ्यांचा मृत्यू

तंगसिरी यांचा मृत्यू इराणसाठी मोठा झटका मानला जात आहे. यापूर्वी सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी, सुरक्षा प्रमुख अली लारिजानी यांचा मृत्यू झाला आहे. १७ मार्च रोजी झालेल्या हल्ल्यात लारिजानी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अनेकांचा मृत्यू झाला होता. रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे प्रवक्ते अली मोहम्मद नैनी यांचा देखील इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.