US attack on Islamic Republic of Iran Navy: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर इस्त्रायल आणि अमेरिका अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. तेहराणमधील महत्त्वाची कार्यालये आणि संवेदनशील ठिकाणांवर इस्त्रायल व अमेरिकेने लक्ष्य केले आहे. तसेच अमेरिकेने इराणच्या नौदलावरही निशाणा साधल्याचा दावा केला आहे. या कारवाईत सुमारे ९ जहाजे बुडाल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. उर्वरित जहाजांचाही शोध सुरू असून तीही नष्ट करण्यात येतील, असे त्यांनी म्हटले आहे.

९ जहाजे बुडवली

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘एक्स’वर यासंदर्भात पोस्ट करत म्हटले आहे की, “मला नुकतीच माहिती मिळाली आहे की आम्ही इराणी नौदलाची ९ जहाजे नष्ट करून बुडवली आहेत. त्यापैकी काही जहाजे मोठी आणि अत्यंत महत्त्वाची होती. आम्ही उर्वरित जहाजांचा शोध घेत आहोत. तीही लवकरच समुद्राच्या तळाशी जातील.”

इराणी नौदलाचे मुख्यालय नष्ट

इस्त्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. इराणच्या नौदलाचेही मोठे नुकसान झाले असून, नौदलाचे मुख्यालय नष्ट केल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. तसेच या युद्धात अमेरिकेचे नौदल प्रभावी कामगिरी करत असल्याचेही ट्रम्प यांनी नमूद केले.

‘ऑपरेशन एपिक फ्युरी’

‘ऑपरेशन रोअरिंग लायन’ ही इस्त्रायल आणि अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणविरुद्ध सुरू केलेली मोठ्या प्रमाणातील संयुक्त लष्करी मोहीम आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट इराणचा अणुकार्यक्रम, क्षेपणास्त्र क्षमता आणि लष्करी नेतृत्व कमकुवत करणे हे आहे. इस्त्रायल आपल्या कारवाईला ‘ऑपरेशन रोअरिंग लायन’ असे संबोधत असताना, अमेरिकेच्या संरक्षण विभागाने आपल्या समांतर कारवाईला ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ असे नाव दिले आहे.

‘आता IRGC चे मुख्यालय उरलेले नाही’

या संयुक्त हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा तसेच इराणमधील अनेक उच्चपदस्थ अधिकारी आणि मंत्र्यांचा मृत्यू झाल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे. दरम्यान, इराणी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) गेल्या ४७ वर्षांत १,००० हून अधिक अमेरिकन नागरिकांचा बळी घेतल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात आला आहे. “कालच्या मोठ्या हल्ल्यात सापाचे डोके छाटले गेले. अमेरिकेकडे जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य आहे आणि ‘आयआरजीसी’चे आता मुख्यालय उरलेले नाही,” असे यूएस कमांडने म्हटले आहे.