Iran negotiators used psychologists for Donald Trump: अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धबंदीचा करार झाला असून, यावर औपचारिक स्वाक्षरी शुक्रवारी होणार आहे. युद्धबंदीच्या करारातील अटींची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण, यामध्ये होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासह युद्धविरामाचा कालावधी वाढवण्याचा समावेश आहे. उभय देशातील कराराबाबत आता महत्वाची माहिती समोर आली असून, इराणने डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर वाटाघाटी करण्यासाठी मानसोपचार तज्ञांची मदत घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. ट्रम्प यांच्या मानसिक स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी वाटाघाटीदरम्यान, इराणने दोन वरिष्ठ मानसशास्त्रज्ञांची मदत घेतल्याचे ‘ड्रॉप साईट’च्या वृत्तात म्हटले आहे.

शिष्टमंडळात वरिष्ठ मानसशास्त्रतज्ञांचा समावेश

डोनाल्ड ट्रम्प यांच्या लहरी स्वभावाचा अंदाज असल्याने इराणने त्यांच्या मानसिक स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी मानसोपचार तज्ञांची मदत घेतली, असे ड्रॉप साईटच्या वृत्तात म्हटलंय. “अमेरिकेबरोबर वाटाघाटी करण्यासाठी आमच्या शिष्टमंडळात दोन वरिष्ठ मानसशास्त्रज्ञांचा समावेश होता. डोनाल्ड ट्रम्प यांचा लहरी आणि तापट स्वभाव लक्षात घेता त्यांना योग्य संदेश पोहोचविण्यात यावा याची काळजी घेण्यात आली होती”, अशी माहिती इराणच्या एका अधिकाऱ्याने ‘ड्रॉप साईट’ला दिली. पाकिस्तानमध्ये शांतता कराराची पहिली बैठक झाली तेव्हापासूनच मानसशास्त्रज्ञ इराणी शिष्टमंडळाला मार्गदर्शन करत असल्याचेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

सकारात्मक फरक पडल्याचा दावा

अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम झाल्यानंतर शांतता चर्चेची पहिली फेरी पाकिस्तानमध्ये पार पडली. या बैठकीत ठोस असा काही तोडगा निघाला नाही आणि यानंतर पुन्हा दुसरी बैठकच झाली नाही. पण, “अमेरिकेबरोबर झालेल्या पहिल्या बैठकीपासूनच इराण अमेरिका आणि ट्रम्प यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी मानसशास्त्रज्ञांची मदत घेत होते”, असा खुलासा इराणी अधिकाऱ्यांनी ड्रॉप साईटशी बोलताना केला. “मानसशास्त्रज्ञांची मदत घेऊन केलेली वाटाघाटी आणि संवादामुळे सकारात्मक फरक पडला”, असेही अधिकाऱ्यांनी पुढे म्हटले आहे.

शुक्रवारी करारावर होणार स्वाक्षरी

हा ऐतिहासिक करार इराणसाठी अत्यंत महत्वाचा आहे, यातील शब्द रचना, मसूदा या सर्व बाबी फार बारकाईने पाहणे गरजेचे होते. या दृष्टिकोनातून काळजी घेण्यात आल्याचे ड्रॉप साईटच्या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, जवळपास चार महिन्यांच्या वाटाघाटीनंतर इराण आणि अमेरिकेत युद्ध समाप्तीचा करार अंतिम झाला आहे. स्वित्झर्लंडमध्ये येत्या शुक्रवारी या करारावर स्वाक्षरी होणार आहे. यासाठी इराणी नेते आणि अमेरिकेचे शिष्टमंडळ हजेरी लावणार आहे.