Iran – US War: इराण आणि अमेरिका यांच्यातील शांतता चर्चा गेल्या काही दिवसांपासून थंडावली आहे. इराणकडून पाकिस्तानकरवी दिले जाणारे शांतता प्रस्तावर डोनाल्ड ट्रम्प वारंवार धुडकावून लावत आहेत. अशात इराणकडून युद्ध समाप्तीसाठी पुन्हा नवा प्रस्ताव अमेरिकेला देण्यात आला आहे. नव्या प्रस्तावात अमेरिका-इस्रायल युद्धामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देणे, इराणच्या जवळच्या भागांतून अमेरिकी सैन्य माघारी घेणे अशा अटींचा समावेश आहे. इराणी सरकारी माध्यमांनी याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

काय आहे इराणचा नवा प्रस्ताव?

आयआरएनए या इराणी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, इराणने युद्धसमाप्तीसाठी अमेरिकेसमोर नवा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावात इराणवर अमेरिकेकडून लादण्यात आलेले सर्व निर्बंध हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच गोठविण्यात आलेला निधी सोडण्यात यावा आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीत असणारे अमेरिकेची नाकेबंदी हटविण्याची मागणी करण्यात आलीय. याशिवाय युद्धामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देणे, इराणच्या जवळच्या भागांतून अमेरिकी सैन्य माघारी घेणे आणि लेबनॉनसह इतर भागातील संघर्ष समाप्त करण्याच्या अटींचा प्रस्तावात समावेश आहे, असे आयआरएनएच्या वृत्तात म्हटले आहे.

नव्या प्रस्तावात काही बदल

आयआरएनएच्या वृत्तानुसार इराणचे उप-परराष्ट्रमंत्री काझेम घरीबाबादी यांनी या प्रस्तावाला दुजोरा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी इराणकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली होती. यानंतर इराणकडून नव्या प्रस्तावात काही महत्वपूर्ण बदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. इराणवर नियोजित हल्ला रोखण्यात आल्याचे सोमवारी ट्रम्प यांनी स्पष्ट केले. इराणकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर हल्ला न करण्याचा निर्णय घेतल्याचे ट्रम्प म्हणाले. नव्या प्रस्तामुळे करार पूर्ण होईल अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली.

दोन्ही देशांची बदलती भूमिका

इराणकडे कधीच अण्वस्त्र असणार नाही याची हमी मिळत नाही तोवर तोडगा निघणार नाही, अशी भूमिका ट्रम्प यांनी घेतली आहे. तर, लष्करी बळाचा वापर करुन शांतता चर्चा होऊ शकत नाही, असे इराणने स्पष्ट केले आहे. करार होईल या अपक्षेने कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांनी इराणवर हल्ला रोखल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी अलिकडेच ट्रुथ सोशलवर केलेल्या पोस्टमधून केला. दरम्यान, पाकिस्तानने इराणकडून प्राप्त झालेला प्रस्ताव अमेरिकेला पाठवला असल्याची माहिती समोर आली आहे. पण, दोन्ही देश त्यांच्या अटी आणि मागण्या वारंवार बदलत असल्याचे मत पाकिस्तानने मांडले.

ट्रम्प यांच्या निर्णयाकडे लक्ष

इराणचा गोठवलेला निधी सोडण्यास अमेरिका तयार असल्याची माहिती समोर आली आहे. तास्निम वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिका इराणी इंधनावर लादलेले निर्बंध हटविण्यास तयार नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, इराणने पाठवलेला नव्या प्रस्तावाला डोनाल्ड ट्रम्प स्वीकारणार की पुन्हा केराची टोपली दाखवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.