How Mojtaba Khamenei survived from US-Israeli strike: ‘द टेलिग्राफ’ला मिळालेल्या एका कथित लीक ऑडिओनुसार, इराणचे नवनियुक्त सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी हे स्फोटाच्या काही मिनिटे आधी कामानिमित्त आवाराबाहेर पडल्यामुळे अमेरिका-इस्रायलच्या भीषण हल्ल्यातून थोडक्यात बचावले. या हल्ल्यात त्यांचे वडील अयातुल्ला अली खामेनी आणि कुटुंबातील इतर सदस्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
रेकॉर्डिंगमध्ये काय?
या ऑडिओमध्ये हल्ल्याचे अत्यंत भीषण तपशीलही समोर आले असून, इराणच्या लष्करप्रमुखांचे अक्षरशः तुकडे तुकडे झाल्याचे म्हटले आहे. तसेच, अयातुल्ला अली खामेनी यांच्या जावयाचे शीर दोन तुकड्यांमध्ये विभागल्याचा दावा करण्यात आला आहे. हे रेकॉर्डिंग अयातुल्ला अली खामेनी यांच्या कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे असल्याचे सांगितले जात आहे. यात २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्याचा सविस्तर आढावा देण्यात आला आहे. या हल्ल्यात इराणच्या सर्वोच्च नेतृत्वावर एकाच वेळी हल्ला करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.
पायाला किरकोळ दुखापत
‘लोकसत्ता’ला या ऑडिओची स्वतंत्रपणे पुष्टी करता आलेली नाही. मात्र, ‘द टेलिग्राफ’च्या वृत्तानुसार, हे रेकॉर्डिंग प्रोटोकॉल प्रमुख मझाहर होसेनी यांचे असून, त्यांनी १२ मार्च रोजी तेहरानमध्ये झालेल्या एका बैठकीत ही माहिती दिली. स्थानिक वेळेनुसार सकाळी ९:३२ वाजता खामेनी यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्यात आला. त्या वेळी ५६ वर्षीय मोजतबा खामेनी काही क्षणांपूर्वीच बाहेर पडले होते. हल्ला झाला तेव्हा ते पुन्हा वरच्या मजल्यावर जात होते. या घटनेत त्यांच्या पत्नी आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर मोजतबा खामेनी यांना पायाला किरकोळ दुखापत झाली.
लष्करप्रमुखाच्या शरीराचे तुकडे
दरम्यान, अली खामेनी यांचा दुसरा मुलगा मुस्तफा खामेनी हा देखील हल्ल्यावेळी जवळच होता. मात्र, तो आपल्या पत्नीसह सुखरूप बचावल्याचे सांगितले जाते. या कथित ऑडिओनुसार, हल्ला अत्यंत शक्तिशाली होता. इराणचे लष्करप्रमुख मोहम्मद शिराझी यांचे शरीर ओळखण्याइतपतही शिल्लक राहिले नाही, असे वर्णन करण्यात आले आहे. तसेच, खामेनी यांचे जावई मिस्बाह अल-हुदा बाघेरी कानी यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला.
या हल्ल्यात कार्यालयीन संकुलातील अनेक इमारतींना एकाच वेळी लक्ष्य करण्यात आले होते. त्यामध्ये खामेनी कुटुंबीयांच्या निवासस्थानांचाही समावेश होता.
