Mojtaba Khamenei On US-Israel Iran War : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्ध अद्याप देखील थांबलेलं नाहीये. या युद्धात काही दिवसांपूर्वी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला, तसेच आतापर्यंत शेकडो नागरिकांनाही प्राण गमवावे लागले आहेत. सध्या देखील अमेरिका आणि इस्रायल हे इराणवर हल्ले करत आहेत, तर इराणही जोरदार प्रतिहल्ले करत आहे. इराण आखाती देशांवरही हल्ले करत असल्याने युद्ध आणखी भडकण्याची चिन्ह आहेत.
अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणने नुकतीच त्यांच्या सर्वोच्च नेत्याची निवड केली आहे. इराणच्या सर्वोच्च नेतेपदी मोजतबा खामेनी यांची निवड झाली आहे. मोजतबा खामेनी यांची सर्वोच्च नेतेपदी निवड झाल्यानंतर आज त्यांनी पहिल्यांदा जाहीर संबोधित केलं आहे. यावेळी मोजतबा खामेनी यांनी अमेरिका-इस्रायलला मोठा इशारा दिला आहे.
‘या प्रदेशातील सर्व अमेरिकन हवाई तळ ताबडतोब बंद करा, आखाती राष्ट्रांवर हल्ले सुरूच राहणार’, असा मोठा इशारा मोजतबा खामेनी यांनी त्यांच्या पहिल्यांदाच केलेल्या संबोधनातून इशारा दिला आहे. इराणच्या सरकारी माध्यमांच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
मोजतबा खामेनी यांनी काय म्हटलं?
इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी त्यांच्या पहिल्या संदेशात इराणच्या जनतेला एकतेचं आवाहन केलं. खामेनी म्हणाले की, “या प्रदेशातील सर्व अमेरिकन हवाई तळ ताबडतोब बंद करावेत, आखाती राष्ट्रांवर हल्ले सुरूच राहतील. तसेच युद्धात मृत्यू पावलेल्या आमच्या नागरिकांचा बदला घेतला जाईल. आपल्या देशांवर हल्ले सुरू असतानाही उत्तम काम करणाऱ्या शूर सैनिकांचे मी आभार मानू इच्छितो. तसेच इराणच्या शत्रूंवर दबाव आणण्यासाठी होर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहील. तसेच शत्रूंकडून झालेल्या नुकसानाची तेहरान भरपाई मागेल किंवा आम्ही त्यांच्या मालमत्तेचं नुकसान करू”, असं मोजतबा खामेनी यांनी म्हटलं आहे.
BREAKING: Iran's new supreme leader said they would leverage the closure of the Strait of Hormuz and attacks on Gulf Arab neighbors would continue. https://t.co/VrxUwEYx3u
— The Associated Press (@AP) March 12, 2026
कोण आहेत मोजतबा खामेनी?
अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागेवर त्यांचे सुपूत्र मोजतबा खामेनी यांची निवड करण्यात आली. गेली ३६ वर्षे अयातुल्ला खामेनी यांनी इराणवर राज्य केलं. आता त्यांचा मुलगा मोजतबा यांच्याकडे देशातील सर्वोच्च पद आलं आहे. इराणची शक्तिशाली धार्मिक संस्था ‘असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स’ने (तज्ज्ञांची परिषद) मोजतबा खामेनी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.
५६ वर्षीय मोजतबा खामेनी यांचा जन्म १९६९ मध्ये मशहद येथे झाला. १९७९ मध्ये इस्लामिक क्रांतीपूर्वी त्यांचे वडील सक्रिय होते, त्या काळात ते लहानाचे मोठे झाले. मोजतबा यांना उच्च दर्जाचे धार्मिक विद्वान मानले जात नाही. त्यांनी कधीही कोणतेही निर्वाचित पद भूषवलेले नाही आणि त्यांच्याकडे कोणतेही औपचारिक सरकारी पद नाही. असं असूनही पडद्यामागून त्यांचा मोठा प्रभाव असल्याचं मानलं जातं. विशेषतः शक्तिशाली ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) सोबत त्यांचे जवळचे संबंध आहेत.
