Donald Trump News : अमेरिकेने गेल्या शनिवारी पहाटेच्या सुमारास व्हेनेझुएलावर हल्ला करून राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे. यानंतर अमेरिकेतील एक प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि धोरण विश्लेषक जेफ्री सॅक्स यांनी गंभीर इशारा दिला आहे. मदुरो यांना ताब्यात घेण्यासाठी केलेल्या कारवाईनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याचे पुढील लक्ष्य इराण असू शकते असे ते म्हणाले आहेत.

भारतातील किमान दोन वृत्तवाहिन्यांशी बोलताना सॅक्स यांनी याबद्दलचे भाष्य केले आहे. सॅक्स म्हणाले की, इस्रायलला इराणचे वेड लागले आहे आणि त्यांनी असाही दावा केला की इस्रायलला हवे असलेले युद्ध अमेरिका लढतो. “मला अशी भीती आहे की पुढील क्रमांक इराणचा असेल. इराणवर नजर ठेवा. इस्रायलला इराणचे वेड लागले आहे आणि त्यांना इराणमधील सरकार उलथवून टाकायचे आहे. कोणत्या कारणामुळे ते १०० टक्के स्पष्ट नाही, पण अमेरिका मुळात इस्रायलच्या अधीन आहे. इस्रायल सांगतो, ते युद्ध अमेरिका लढतो. हे खरं तर प्रचंड डार्क आहे,” असे सॅक्स यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.

सॅक्स यांच्या मते, २९ डिसेंबर रोजी डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मार-ए-लागो येथे दिलेले संयुक्त निवेदनातून इराण पुढील लक्ष्य असल्याबद्दल सूचित करण्यात आले. सॅक्स यांनी इराणमधील आंदोलनाबाबत ट्रम्प यांनी केलेल्या विधानाकडेही यावेळी लक्ष्य वेधले.

हल्ला करण्यासाठी एक प्रकारची स्टँडर्ड रणनीती वापरली जात असल्याचा दावा सॅक्स यांनी केला आहे. “ही उघडपणे एक विशिष्ट डीप-स्टेट चिथावणी होती- ‘इराणच्या लोकांचे रक्षण’ करण्यासाठी इराणवर आक्रमण करणे हा युक्तीवाद मानवी हक्कांशी जोडणे. हे एक स्टँडर्ड प्लेबुक आहे,” असे सॅक्स म्हणाले.

गेल्या शनिवारी अमेरिकेच्या लष्कराने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या कराकस येथील निवासस्थानी छापा टाकला आणि त्यांना देशाबाहेर नेण्यात आले. यामुळे संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली. बहुतेक देशांनी अमेरिकेच्या या कारवाईचा निषेध केला असला तरी, प्रत्यक्षात कोणीही काहीही करू शकले नाही.

इराणबद्दल बोलायचे झाल्यास, वाढलेल्या महागाईच्या विरोधात डिसेंबर महिन्यापासून इराणमध्ये आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनांमध्ये आत्तापर्यंत दोन डझनहून अधिक जणांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त एएफपीने दिले आहे.

ट्रम्प यांनी पोस्ट करत इराणमधील सरकारला इशारा दिला होता. जर इराण सरकारने शांततापूर्ण मार्गान आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर कठोर कारवाई केली तर त्यांचे संरक्षण करण्यासाठी अमेरिका हस्तक्षेप करेल असे ट्रम्प म्हणाले होते.

कराकसमध्ये केलं ते तेहरानमध्ये शक्य आहे?

व्हेनेझुएलाची राजधानी कराकसमध्ये अमेरिकेने जे करून दाखवलं ते तेहरानमध्ये शक्य होईल का? तर जेफ्री सॅक्स यांच्या मते इराणवर आक्रमण करणे ही अमेरिकेची मोठी चूक ठरू शकते.

“येथेच मला एका खऱ्या मोठ्या जागतिक स्फोटाची शक्यता वाटते. जर हे घडले तर ते व्हेनेझुएलापेक्षाही अधिक भीषण असेल. हे एकप्रकारे विनाशकारी असेल, कारण व्हेनेझुएला हा भौगोलिकदृष्ट्या अमेरिकेच्या जवळ आहे, आणि चीन किंवा रशिया तिथे अमेरिकेला आव्हान देऊ इच्छित नाहीत. मात्र, इराण हे अनेक शक्तींच्या मध्यभागी आहे. इराणकडे हायपरसोनिक क्षेपणास्त्रे आहेत आणि मोठ्या प्रमाणात नुकसान करण्याची क्षमता आहे. इस्रायल हा अण्वस्त्र असलेला देश आहे. एकंदरीत, ही एका मोठ्या संभाव्य आपत्तीची पूर्वतयारी ठरू शकते,” असेही त्यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले.

इराणमध्ये नेमकं काय सुरू आहे?

इराणमध्ये महागाईचा भडका उडाला असून त्या विरोधात हजारो लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी इराणवर निर्बंध लादल्याने इराणमध्ये डिसेंबर महिन्यात महागाई ४२.५ टक्क्यांनी वाढली आहे. इस्रायलबरोबर जूनमध्ये चाललेल्या सात दिवसांच्या संघर्षाचाही इराणच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. त्यामुळे इराणमध्ये सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना सत्तेवरून हटवण्याची मागणी जोर धरत आहे. यादरम्यान आंदोलक आणि सरकार यांच्यातील संघर्षात अनेकांचा मृत्यू झाला आहे.