Iran Oil Supertankers latest news : अमेरिकेने इराणभोवती आपले नौदल निर्बंध (Naval Blockade) अधिक कडक केले असतानाही, उपग्रहाद्वारे मिळालेली छायाचित्रे असे दर्शवतात की, इराण अजूनही आपल्या मुख्य निर्यात केंद्रावर सुपरटँकर्समध्ये तेल भरत आहे.
ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, सोमवारी युरोपियन युनियनच्या ‘सेंटिनेल १’ उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रांमध्ये इराणच्या ‘खार्ग बेटा’वरील (Kharg Island) मुख्य तेल निर्यात केंद्राच्या जेटीवर एक महाकाय कच्चे तेल वाहून नेणारे जहाज (VLCC) उभे असल्याचे दिसते. हे जहाज सुमारे २० लाख बॅरल तेल वाहून नेण्यास सक्षम आहे. विशेष म्हणजे, मागील शनिवारी घेतलेल्या छायाचित्रात येथे एकही जहाज नव्हते.
सोमवारच्या छायाचित्रात बेटाच्या पूर्वेला १३ जहाजे नांगरलेली दिसत आहेत, ज्यात बहुतांश सुपरटँकर्स आहेत. १३ एप्रिल रोजी नाकेबंदी सुरू होण्यापूर्वीच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. यावरून असे सूचित होते की, नाकेबंदी लागू झाल्यापासून इराणने तेल भरण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढवला आहे. अमेरिकन नाकेबंदीतून मोठ्या प्रमाणात तेल बाहेर पडल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे, उपलब्ध असलेल्या सर्व टँकर्समध्ये तेल भरून ठेवण्याचे धोरण इराणने अवलंबले असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.
अमेरिकन नाकेबंदीचा विस्तार
अमेरिकन नौदलाच्या मते, ओमानच्या समुद्रात सुरू असलेल्या समुद्री निर्बंधांमुळे आतापर्यंत इराणची सुमारे ३ डझन जहाजे परतवून लावण्यात आली आहेत. पाकिस्तानच्या सीमेजवळील चाबहार बंदराबाहेर तेलवाहू जहाजांची गर्दी वाढत आहे, कारण त्यांना पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

ही नाकेबंदी केवळ ओमानच्या आखातापुरती मर्यादित नाही. या आठवड्यात अमेरिकन फौजांनी हिंदी महासागरात ‘मॅजेस्टिक एक्स’ (Majestic X) नावाच्या इराणी तेलवाहू टँकरवर ताबा मिळवला. तसेच, श्रीलंकेच्या जवळ ‘टिफानी’ (Tifani) नावाचे दुसरे जहाजही अडवण्यात आले. ही दोन्ही जहाजे अमेरिकेच्या निर्बंधांच्या यादीत आहेत. यावरून वॉशिंग्टन इराणच्या आसपासच्या क्षेत्राबाहेरही ही नाकेबंदी कडकपणे लागू करण्यास तयार असल्याचे स्पष्ट होते.
इराण किती काळ तग धरू शकेल?
इराणकडे सुमारे ९ कोटी बॅरल तेल साठवण्याची क्षमता आहे. जर अमेरिकेने निर्यात पूर्णपणे रोखली, तरीही इराण पुढील दोन महिने दररोज ३५ लाख बॅरल या वेगाने तेल उत्पादन सुरू ठेवू शकतो, असे ‘FGE NexantECA’ मधील विश्लेषकांचे म्हणणे आहे. सध्या टँकर्समध्ये तेल भरल्यामुळे इराणला साठवणुकीच्या समस्येपासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
तजेपी मॉर्गनच्या विश्लेषकांनी स्पष्ट केले आहे की, जर ही नाकेबंदी दीर्घकाळ टिकली, तर इराणला केवळ आर्थिकच नव्हे तर तांत्रिक अडचणींचाही सामना करावा लागेल आणि शेवटी त्यांना तेल उत्पादन कमी करावेच लागेल.
