Iran oil tanker Ping Shun route change news update India vs China : अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या काही आठवड्यांपासून संघर्ष सुरू आहे. या संघर्षामुळे जागतिक तेल वाहतुकीसाठी महत्त्वाचा सागरी मार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी इराणने रोखून धरली आहे. याचा परिणाम म्हणून जगभरात इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. यादरम्यान इराणचे कच्चे तेल घेऊन भारतात येणे अपेक्षित असलेल्या जहाजाने आपला मार्ग बदलला असून ते आता चीनच्या दिशेने जात आहे.
Kpler या जहाज-ट्रॅकिंग फर्मने दिलेल्या माहितीनुसार, २००२ मध्ये बांधणी करण्यात आलेले आणि २०२५ मध्ये अमेरिकेने निर्बंध लादलेले पिंग शुन (Ping Shun) हे अफ्रामॅक्स टँकर आता चीनमधील डोंगयिंग (Dongying)कडे जात आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला हे जहाज भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील वाडीनार येथे पोहोचेल असे संकेत मिळाले होते, पण या जहाजाने आपला मार्ग अचानक दक्षिणेकडे वळवला आहे. ‘ब्लूमबर्ग’च्या वृत्तानुसार, ट्रॅकिंग डेटा हा अंतिम नसून जहाज नेमके कुठे जाणार हे शेवटच्या क्षणी अजूनही बदलू शकते.
एस्वातिनी ध्वज असलेले पिंग शुन या जहाजाने यापूर्वी ट्रान्सपॉन्डर्स आणि एआयएस (ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टम) च्या माध्यमातून संकेत दिले होते की हे टँकर वाडीनार येथील ऑफशोर टर्मिनलच्या मार्गावर असून ते ४ एप्रिल रोजी तेथे पोहोचणे अपेक्षित आहे.
मार्ग बदलण्याचे कारण काय?
या प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले की, हे जहाज सुरूवातीला भारतात येणार होते. दुसऱ्या एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, जहाजाचा मार्ग बदलण्यामागे किंमत, इन्शुरन्स, ऑपरेटिंग क्रू किंवा कागदपत्रांशी संबंधित अडचणी अशी अनेक कारणे असू शकतात. मात्र, जहाजाने आपला मार्ग नेमका कोणत्या कारणामुळे बदलला, याची माहिती नसल्याचेही त्यांनी पुढे सांगितले. हिंदुस्तान टाइम्सने यासंबंधी वृत्त दिले आहे.
यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २१ मार्च रोजी अधीच टँकरमध्ये भरण्यात आलेले इराणी कच्चे तेल विकण्याची परवानगी दिली होती. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.
भारत आपली ऊर्जेची गरज भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. भारत आपले सुमारे ९० टक्के कच्चे तेल, जवळपास अर्धा नैसर्गिक वायू (LNG) आणि साधारणपणे दोन-तृतीयांश एलपीजी हा बाहेरून आयात करतो. हे जवळपास सर्व होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतात येते. मात्र २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये संघर्ष सुरू झाल्यापासून इराणने होर्मुझमधून होणाऱ्या सागरी वाहतुकीवर कडक निर्बंध घातल्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
