Benjamin Netanyahu death rumors: इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) इस्रायली पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांचा पाठलाग सुरू ठेवण्याची शपथ घेतली असून, पश्चिम आशियातील वाढत्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ‘ते जिवंत असतील तर ते लक्ष्य राहतील’ असे म्हटले आहे.
“नेतान्याहू जिवंत असेल तर…”
एका निवेदनात ‘आयआरजीसी’ने नेतान्याहू यांना ‘गुन्हेगार झायनिस्ट पंतप्रधान’ असे संबोधले आहे. ‘ते जिवंत राहिले तर त्यांचा पाठलाग करून हत्या करण्याचे प्रयत्न सुरूच राहतील’ असे म्हटले आहे. ‘जर गुन्हेगार आणि बालहत्यारा नेतान्याहू अजूनही जिवंत असेल, तर आम्ही त्यांचा पाठलाग सुरू ठेवू’, असे या निवेदनात म्हटले आहे.
तेल अवीव शहरावर हल्ला
निवेदनानुसार, इराणी सैन्याने तेल अवीवमधील औद्योगिक क्षेत्रांवर जोरदार क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये जीवितहानी झाल्याचा दावा करत, संपूर्ण शहरात रुग्णवाहिकांचे सायरन वाजू लागल्याचेही सांगण्यात आले आहे. ‘आयआरजीसी’ने असेही म्हटले आहे की एर्बिलमधील अल-हरिर हवाई तळ, कुवेतमधील अली अल सलेम हवाई तळ तसेच कॅम्प आरिफजान यांसारख्या अमेरिकन सैन्याशी संबंधित ठिकाणांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले.
हत्येचा दावा फेटाळला
दरम्यान, इराणी सैन्याने नेतान्याहू यांच्या भवितव्याबाबतही संभ्रम निर्माण करणारा दावा केला आहे. त्यांना ठार मारण्यात आले असावे किंवा ते कुटुंबासह इस्रायलमधून पळून गेले असावेत, असे सूचित करण्यात आले. मात्र, नेतान्याहू यांच्या कार्यालयाने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले त्यांच्या हत्येबाबतचे दावे फेटाळून लावले आहेत.
पंतप्रधान सुखरूप
तुर्कीस्थित अनाडोलू एजन्सीने प्रसारित केलेल्या वृत्तांबाबत विचारले असता, इस्त्रायली पंतप्रधान कार्यालयाने हे सर्व दावे पूर्णपणे खोटे असल्याचे सांगितले. ‘ही खोटी बातमी आहे; पंतप्रधान सुरक्षित आहेत,’ असे कार्यालयाने स्पष्ट केले.
सोशल मीडियावर अफवा
दरम्यान, नेतान्याहू यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये त्यांच्या हातावर अतिरिक्त बोट दिसल्याचा दावा होताच सोशल मीडियावर अफवा पसरल्या. काही वापरकर्त्यांनी हा व्हिडिओ एआय-जनरेटेड किंवा डीपफेक असू शकतो, असा संशय व्यक्त केला. नेतान्याहू यांनी १३ मार्च रोजी शेवटचा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये त्यांनी इस्रायल आणि इराणमधील संघर्ष तीव्र होत असताना इस्रायल ‘इराण आणि हिजबुल्लाहला चिरडत आहे’ असे म्हटले होते.
