Iran Foreign Minister Abbas Araghchi denies reports of rejecting Pakistan’s mediation role in the ongoing conflict : अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात पाकिस्ताने मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली होती. दरम्यान पाकिस्तानच्या मध्यस्थी करण्याबाबत इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी शनिवारी महत्त्वाचे विधान केले आहे.
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी शनिवारी स्पष्ट केले की, त्यांच्या देशाने इस्लामाबादमधील मध्यस्थीच्या चर्चेला कधीही नकार दिला नाही. पाकिस्तानने चर्चेचे यजमानपद भूषवण्याबाबत घेतलेल्या पुढाकारानंतर, प्रक्रियेत काही अडथळे आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हे विधान केले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये अराघची म्हणाले की, अमेरिकन माध्यमांमध्ये इराणची भूमिका ही चुकीच्या पद्धतीने दाखवली जात आहे. तसेच त्यांनी पाकिस्तान करत असलेल्या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता देखील व्यक्त केली. “आम्ही इस्लामाबादला जाण्यास कधीही नकार दिला नाही,” असे अराघची पुढे म्हणाले.
आमच्यासाठी महत्त्वाचे आहे ते म्हणजे, आमच्यावर लादण्यात आलेल्या बेकायदेशीर युद्धाच्या निर्णायक आणि कायमस्वरूपी शेवटासाठीच्या अटी,” असेही ते पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा घडवून आणण्याच्या प्रक्रियेत काही प्रमाणात प्रगती झालेली असली तरी, इराणच्या बाजूने प्रतिसाद मिळत नसल्याने या चर्चेचा वेग मंदावल्याचा दावा करण्यात आला होता. याबद्दलचे दावे अमेरिकेतील ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ आणि पाकिस्तानातील ‘डॉन’ या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले होते.यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ताहिर अंद्राबी यांनी पुढे येत हे दावे निराधार असल्याचे सांगून फेटाळून लावले होते.
पाकिस्तानकडून मध्यस्थीसाछी प्रयत्न
पाकिस्तानकडून अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धविराम घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, मात्र पाकिस्तानला अद्याप यामध्ये यश मिळालेले नाही।
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी शुक्रवारी सौदीचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान अल सौद यांच्याशी चर्चा केली. यावेळी या दोन नेत्यांमध्ये पाकिस्तान आणि चीनने मांडलेल्या ५ कलमी शांतता योजनेवर चर्चा झाली, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि पाकिस्तानचे इशाक डार यांच्यात बीजिंगमध्ये झालेल्या चर्चेनंतर हा शांतता प्रस्ताव मांडण्यात आला आहे. दार हे यासाठी एक दिवसाच्या बीजिंग दौऱ्यावर गेले होते.
