एपी, कैरो
अमेरिकेने युद्ध थांबवले आणि इराणी बंदरांची केलेली नाकेबंदी हटवली तर आम्ही होर्मुझची सामुद्रधुनी खुली करू, असा प्रस्ताव इराणने अमेरिकेपुढे ठेवला आहे. त्याचवेळी अणुकार्यक्रमावर नंतरच्या टप्प्यात चर्चा करू असेही इराणने सुचवले आहे. या चर्चेची माहिती असलेल्या इराणच्या दोन अधिकार्यांनी यासंबंधी माहिती दिली.
इराण-पाकिस्तानच्या चर्चेत इराणने हा प्रस्ताव सादर केला. तो पाकिस्तानतर्फे अमेरिकेला पाठवण्यात आला असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तो स्वीकारण्याची शक्यता कमी आहे. अमेरिकेने युद्धसमाप्तीसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याबरोबरच इराणच्या अणुकार्यक्रमावरही आग्रही भूमिका घेतली आहे.
अमेरिका आणि इराणमध्ये सध्या युद्धविराम आहे. मात्र, अमेरिकी नौदलाने इराणच्या बंदरांची नाकेबंदी केल्यामुळे इराणला आपल्या तेलाची विक्री करणे कठीण जात असून त्यामुळे त्या देशावरील आर्थिक ताण आणखी वाढला आहे.
दुसरीकडे इराणनेही होर्मुझची सामुद्रधुनी पूर्ण बंद केली आहे. जगातील २० टक्के कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक तेथून होते. दोन्ही देशांच्या ताठर भूमिकांमुळे जागतिक पुरवठासाखळीवर परिणाम झाला आहे. जगभरात खत, कच्चे तेल आणि इतर आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर विपरित परिणाम झाला आहे.
जहाजावरील भारतीय नाविक सुरक्षित
नवी दिल्ली : इराणी समुद्रात ओमानच्या हद्दीत असलेल्या एका जहाजावर इराणच्या तटरक्षक दलाने इशारा देत गोळीबार केला. त्या जहाजावर १७ भारतीय नाविक होते आणि ते सर्व सुरक्षित आहेत, अशी माहिती बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने सोमवारी दिली. टोगोच्या मालकीचे एमटी-कायरन ७ हे जहाज ओमानच्या शिनास या बंदराजवळ होते. त्यावेळी इराणच्या तटरक्षक दलाने त्याच्यावर गोळीबार केला.
अराघची-पुतिन भेट
पाकिस्तानातून रशियाच्या दौर्यावर गेलेले इराणचे परराष्ट्रमंत्री सईद अब्बास अराघची यांनी सोमवारी सेंट पीटर्सबर्ग येथे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतली. यावेळी पुतिन यांची इराणी नागरिकांची ‘आपल्या सार्वभौमत्वासाठी धाडसाने आणि शौर्याने लढणारे लोक,’ या शब्दांमध्ये प्रशंसा केली. तसेच पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही दिले.
आतापर्यंत ३८ जहाजे माघारी
फ्लोरिडा : अमेरिकेने इराणची नौदल नाकेबंदीची अंमलबजावणी कठोरपणे सुरू ठेवली असून, इराणच्या बंदरातून निघालेली ३८ जहाजांना आतापर्यंत माघारी पाठवले आहे, अशी माहिती अमेरिकेच्या मध्य कमांडने दिली आहे. इराणच्या सागरी भागातून कुठल्याही जहाजाला जाण्यास अमेरिका प्रतिबंध करीत आहे. इराणनेही ‘होर्मुझ’भोवतीची पकड आणखी घट्ट केली आहे.
