Masoud Pezeshkian : अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणने आणखी आक्रमक होत इस्त्रायल आणि अमेरिकेच्या हवाई तळांवर प्रतिहल्ले केले आहेत. अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर काही तासांतच इराणने अयातुल्ला अराफी यांची इराणचे अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती केली आहे.
दरम्यान, अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा इशारा आता इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी दिला आहे. ‘खामेनींच्या हत्येचा बदला घेणं हा आमचा कायदेशीर अधिकार आहे’, असं वक्तव्य मसूद पेझेश्कियान यांनी केलं आहे. त्यामुळे आता अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमधील युद्ध आणखी भडकण्याची चिन्हं आहेत. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी म्हटलं की, “सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येचा बदला घेणं हे इस्लामिक रिपब्लिकचं हक्क आणि कर्तव्य आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण या गुन्ह्याच्या गुन्हेगारांचा आणि सूत्रधारांचा बदला घेणं हे कायदेशीर कर्तव्य आणि अधिकार मानतो”, असं मसूद पेझेश्कियान यांनी एका निवेदनात म्हटलं आहे.
“इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सर्वोच्च राजकीय अधिकार्याची आणि जगभरातील शिया धर्माच्या एका प्रमुख नेत्याची हत्या, ही मुस्लिमांविरुद्ध आणि विशेषतः जगभरातील शिया मुस्लिमांविरुद्ध उघडपणे युद्धाची घोषणा मानली जाते”, असं मसूद पेझेश्कियान यांनी म्हटलं आहे.
अयातुल्ला अराफी इराणचे नवे सर्वोच्च नेते
हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर आता अयातुल्ला अलीरेजा अराफी यांना तात्पुरते इराणचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्त करण्यात आलं आहे. अराफी यांना नेतृत्व परिषदेचं कायदेतज्ज्ञ सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे आणि त्यांना सर्वोच्च नेत्याची भूमिका पार पाडण्याचं काम देण्यात आलं आहे, असे वृत्तसंस्था इराणी स्टुडंट्स न्यूज एजन्सी (ISNA) ने दिलं आहे.
अयातुल्ला अली खामेनी यांच्या उत्तराधिकारी होण्याच्या शर्यतीत अराफी हे प्रमुख आघाडीवर आहेत. ६७ वर्षीय हे एक अनुभवी धर्मगुरू आणि खामेनी यांचे जवळचे सहकारी आहेत. अराफी सध्या सर्वोच्च नेत्याची नियुक्ती करणाऱ्या तज्ञांच्या सभेचे उपाध्यक्ष म्हणून काम करतात. ते इराणच्या मदरसा प्रणालीचेही प्रमुख आहे.
