दिल्लीत १८ वी ‘ब्रिक्स शिखर परिषद’ नुकतीच पार पडली. या परिषदेत रशिया, चीन, इराण, यूएईसह आदी देशांचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. याच ब्रिक्स परिषदेदरम्यान अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. या परिषदेसाठी इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान हे देखील भारतात आले होते. त्यांच्या या भारत दौऱ्यादरम्यान त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. पण या कार्यक्रमातील पेझेश्कियान यांचा आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यावरून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत.
इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांनी एका कार्यक्रमादरम्यान हिंदू आध्यात्मिक गुरूंचा आशीर्वाद घेतल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून अनेक वेगवेगळे दावे केले जात आहेत. मात्र, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता इराणच्या दूतावासाकडूनही यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
पेझेश्कियान यांचा व्हायरल व्हिडीओ नेमकं काय आहे? पेझेश्कियान यांनी खरंच हिंदू आध्यात्मिक गुरूंचा आशीर्वाद घेतला का? व्हायरल व्हिडीओमागचं सत्य नेमकं काय? इराणने या व्हिडीओबाबत काय स्पष्टीकरण दिलं? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
व्हायरल व्हिडीओत काय दिसत आहे?
भारतातील इराणचे राजदूत डॉ.मोहम्मद फतहली यांनी नवी दिल्ली येथे ११ सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी धार्मिक नेते, विचारवंत आणि इतर मान्यवरांची भेट घेतली होती. यावेळी मसूद पेझेश्कियान यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये असं दिसत आहे की पेझेश्कियान हे आशीर्वाद घेण्यासाठी रामानंदाचार्य स्वामी सतीश आचार्य यांच्या पायांना स्पर्श करत आहेत. एका एक्स वापरकर्त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे आणि असा दावा केला की, “इराणच्या अध्यक्षांनी एका हिंदू आध्यात्मिक गुरूंच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला.”
व्हायरल VIDEO चं सत्य काय?
इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. व्हिडीओमधील दृश्ये व्यवस्थित पाहिल्यास या व्हिडीओमध्ये पेझेश्कियान आणि रामानंदाचार्य स्वामी सतीश आचार्य हे दोघेही वाकताना दिसत आहेत. मात्र, पेझेश्कियान हे आपल्या हातातील काहीतरी खाली पडल्यानंतर ते घेण्यासाठी खाली वाकताना दिसत आहेत, तर रामानंदाचार्य स्वामी सतीश आचार्य हे देखील खाली पडलेला पेन किंवा काहीतरी कागदपत्र घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे हा व्हायरल झालेला व्हिडीओ एडिट केलेला आणि खोटा असल्याचा दावा केला जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
इराणी दूतावाने काय म्हटलं?
दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान पेझेश्कियान हे एका हिंदू आध्यात्मिक गुरूंच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकताना दिसत असल्याच्या व्हिडीओबाबत आता इराणी दूतावाने स्पष्टीकरण दिलं आहे. इराणी दूतावासातील सूत्रांनी सांगितलं की, या व्हिडीओचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. त्यातील दृश्य मॅनिप्युलेट करून तयार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे पेझेश्कियान यांनी कोणत्याही आध्यात्मिक गुरूंच्या पायाला स्पर्श केलेला नाही किंवा आशीर्वाद घेतलेले नाहीत.
सूत्रांच्या माहितीनुसार, एक पत्र चुकून पेझेश्कियान यांच्या हातातून खाली पडलं होतं. ते पत्र उचलण्यासाठीच पेझेश्कियान खाली वाकले होते आणि त्याच वेळी तो क्षण टिपला गेला. मात्र, व्हायरल झालेला व्हिडीओ दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणारा आहे.
