Iran’s Open Letter to American People: इराणचे राष्ट्रअध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी आता ट्रम्प यांच्याच पावलावर पाऊल ठेवत थेट अमेरिकन जनतेलाच उद्देशून एक पत्र लिहले आहे. इराणविरोधात युद्धाला सुरुवात कण्यापूर्वी, “इराणी जनतेसाठी आपला देश परत मिळवण्याची ही एकमेव सर्वात मोठी संधी आहे”, अशा शब्दात ट्रम्प यांनी इराणी जनतेला साद घातली होती. अशाच पद्धतीने आता पेझेश्कियन यांनी अमेरिकन जनतेला पत्राच्या माध्यमातून साद घातली आहे.
इराण सामान्य अमेरिकी नागरिकांचा शत्रू नाही – मसूद पेझेश्कियन
संघर्षावर तोडगा निघण्याचे संकेत दिसत नसताना मसूद पेझेश्कियन यांनी लिहले पत्र महत्वाचे मानले जात आहे. पेझेश्कियन यांच्या पत्रात “इराण सामान्य अमेरिकी नागरिकांचा शत्रू नाही”, या ओळीचा वारंवार उल्लेख करण्यात आला आहे. इराणने व्हाईट हाऊसऐवजी थेट अमेरिकेच्या जनतेला उद्देशून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. “इराणी नागरिकांच्या मनात अमेरिकी नागरिकांच्या बद्दल द्वेष नाही”, असे पेझेश्कियन यांनी पत्रात नमूद केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात इराणविरोधात कारवाई तीव्र करण्याचा इशारा दिल्यानंतर पेझश्कियन यांनी लिहलेले पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.
युद्ध खरोखरच अमेरिकेच्या हिताचे आहे का?
इराण संपलाय या ट्रम्प यांच्या दाव्याला पेझेश्कियन यांनी पत्रातून खोडून काढण्याचा प्रयत्न केला. हे युद्ध खरोखरच अमेरिकेच्या हिताचे आहे का, आणि सततच्या लष्करी कारवाईमुळे नागरिकांना फायदा होतो की केवळ भू-राजकीय महत्त्वाकांक्षा टिकून राहतात? असा सवाल पेझश्कियन यांनी पत्रातून उपस्थित केला आहे. पेझेश्कियन यांनी ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ सिद्धांतावरही टीका केली, दीर्घकाळ चाललेल्या संघर्षामुळे तो कमकुवत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
म्हणून इराण धोका असल्याचे चित्र उभं केलं जातंय
इराण धोका असल्याचे चित्र निर्माण करण्यामागे व्यापक उद्देश असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. “लष्करी दबाव आणि जागतिक स्तरावरील वर्चेस्व कायम ठेवण्यासाठी इराण धोका असल्याचे चित्र उभं केलं जात आहे”, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. “ही धारणा शक्तिशाली लोकांच्या राजकीय आणि आर्थिक लहरींचे उत्पादन आहे, अशा शब्दात त्यांनी भूमिका मांडली. दबाव योग्य ठरवण्यासाठी, लष्करी वर्चस्व टिकवण्यासाठी, शस्त्रास्त्र उद्योगाला चालना देण्यासाठी आणि मोक्याच्या बाजारपेठांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, अशा वातावरणात, जर धोका अस्तित्वात नसेल, तर तो निर्माण केला जातो”, असेही पेझेश्कियन यांनी पत्रात म्हटले आहे.
अमेरिका इस्रायलसाठी ‘गट’ म्हणून काम करतंय
अमेरिका इस्रायलसाठी ‘गट’ म्हणून काम करत आहे. अमेरिकन लोकांचे प्राण आणि करदात्यांचा पैसा अशा संघर्षात ओढला जात आहे, जो प्रामुख्याने दुसऱ्या देशाच्या सामरिक हितासाठी वापरला जात आहे, असेही पेझेश्कियन म्हणालेत. अफवांच्या पलिकडे जाणून अमेरिकेच्या नागरिकांनी विचार करावा, किमान इराणला भेट दिलेल्या नागरिकांनी तरी याबाबत बोलावे. संघर्ष वाढल्यास स्थानिकच नव्हे तर जागतिक स्तरावरही अस्थिरता निर्माण होऊ शकते, असे पेझेश्कियन म्हणाले.
