BRICS Summit 2026 : १८ वी ‘ब्रिक्स शिखर परिषद’ दिल्लीत पार पडत आहे. या ब्रिक्स परिषदेत अनेक देशांचे प्रमुख सहभागी झाले आहेत. रशिया, चीन, इराण, यूएईसह आदी देशांचे प्रमुख नेते ब्रिक्स परिषदेत सहभागी झाले आहेत. या परिषदेच्या बैठकीला आज औपचारिकपणे सुरुवात झाली आहे. या बैठकीत जगातील विविध जागतिक विषयांवर चर्चा होत आहेत. असं असतानाच एक मोठी घडामोड यावेळी पाहायला मिळाली आहे.

ब्रिक्स नेत्यांच्या परिषदेदरम्यान इराणचे मसूद पेझेश्कियान आणि अबू धाबीचे क्राउन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट झाली आहे. यावेळी फक्त भेट झाली नसून दोन्ही नेत्यांमध्ये मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीत राजनैतिक संवाद कायम राखण्याच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर महत्वाची चर्चा देखील झाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि इराण युद्ध सुरू आहे. त्यामुळे पश्चिम आशियात तणाव निर्माण झालेला आहे. या दरम्यान इराण आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये देखील काही मतभेदांमुळे तणाव निर्माण झालेला आहे. असं असताना आज नवी दिल्लीत ब्रिक्स परिषदेदरम्यान इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि अबू धाबीचे क्राउन प्रिन्स यांची भेट झाल्यामुळे ही एक मोठी घडामोड मानली जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

भारतातील इराणच्या दूतावासाने काय म्हटलं?

“इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी ब्रिक्स परिषदेदरम्यान संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) नेते तथा अबू धाबीचे क्राउन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेतली आणि चर्चा केली”, असं भारतातील इराणच्या दूतावासाने एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, यूएई आणि इराण यांच्यातील अलीकडच्या काळातील संबंध पाहता ही भेट महत्त्वाची ठरते. मध्यपूर्वेत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने यूएईवर वारंवार क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ले केले आहेत. यूएईच्या नेतृत्वाने या हल्ल्यांचा निषेध करत आपल्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन मानलं आहे आणि प्रत्युत्तर देण्याचा अधिकार राखून ठेवल्याचा इशारा दिलेला होता.

त्यामुळे नवी दिल्लीत मसूद पेझेश्कियान आणि यूएई नेते शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची झालेली ही बैठक केवळ आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेच्या निमित्ताने होणारी एक सामान्य भेट न राहता अधिक महत्त्वाची ठरते.लष्करी संघर्षामुळे प्रादेशिक संबंध अत्यंत अस्थिर बनलेले असतानाच दोन्ही बाजूंना थेट राजनैतिक संवाद सुरू ठेवण्याची एक मोठी संधी यातून मिळाल्याचं बोललं जात आहे.