Masoud Pezeshkian On US : अमेरिका-इराण युद्ध ८ एप्रिल रोजी तात्पुरतं थांबलं. मात्र, अद्यापही या युद्धाबाबत कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. पाकिस्तानच्या माध्यमातून दोन्ही देशांत शांतता करारासाठी हालचाली सुरू आहेत. या चर्चेची दुसरी फेरी लवकरच सुरू होणार असल्याची माहिती देखील सांगितली जाते. पण असं असतानाही सध्या इराण आणि अमेरिकेत मोठा तणाव आहे. कारण अमेरिकेकडूनही होर्मुझच्या सामुद्रधुनीवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा इराण करत आहे. त्यामुळे हा तणाव वाढत असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान आता इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘आम्हाला अणुहक्कांपासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही’, असं मसूद पेझेश्कियन यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा रोख एकप्रकारे अमेरिकेकडेच असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मसूद पेझेश्कियन यांनी काय म्हटलं?

“सध्या सुरू असलेला संघर्ष तेहरान सन्मानाने संपवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, कोणत्याही देशाला इराणला त्याच्या कायदेशीर अणुहक्कांपासून वंचित ठेवण्याचा अधिकार नाही. इराणचा युद्धाची व्याप्ती वाढवण्याचा कोणताही हेतू नाही. तसेच आमच्या देशाची धोरणं प्रादेशिक शांतता व स्थिरता राखण्यावर केंद्रित आहेत. पण असं असलं तरी आमच्या अणुहक्कांपासून आम्हाला वंचित ठेवण्याचा अधिकार कोणालाही नाही. आमची मागणी आहे की सर्वांना समानतेच्या आधारावर वागवलं जावं. आमची मूलभूत भूमिका या प्रदेशात शांतता, स्थिरता आणि सुरक्षा जपण्यावर आधारितच आहे”, असं मसूद पेझेश्कियन यांनी स्पष्ट केलं आहे.

“इराणने कोणताही संघर्ष सुरू केलेला नाही आणि इतर राष्ट्रांवर हल्ले करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. आम्ही युद्धाचं वर्तुळ विस्तारू पाहत नाहीत. आम्ही कोणतंही युद्ध किंवा संघर्ष सुरू केलेला नाही. कोणत्याही देशावर हल्ला करण्याचा आमचा हेतू नाही आणि आम्ही आत्मसंरक्षणाचा आमचा कायदेशीर आणि वैध अधिकार वापरत आहोत”, असंही मसूद पेझेश्कियन यांनी अल जझीराशी बोलताना म्हटलं आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना मसूद पेझेश्कियन यांनी शत्रूंवर त्यांची उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्याचा आरोप केला. तसेच नागरी पायाभूत सुविधांवर हल्ले करून आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केल्याचाही आरोप पेझेश्कियन यांनी केला. पेझेश्कियन म्हणाले की, “शत्रू आपली उद्दिष्ट्ये साध्य करण्यात अयशस्वी ठरले. त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन केलं. आमच्या पायाभूत सुविधा, शाळा व रुग्णालयांवर हल्ले केले. ट्रम्प म्हणतात की इराण आपल्या अणुहक्कांचा वापर करू शकत नाही. पण कोणत्या गुन्ह्यासाठी हे ते सांगत नाहीत. एका राष्ट्राला त्याच्या हक्कांपासून वंचित ठेवणारे ते कोण आहेत?”, असं म्हणत मसूद पेझेश्कियन यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली.