Masoud Pezeshkian On Donald Trump : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्ध आणखी भडकण्याची चिन्ह दिसत आहेत. अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र, तरीही इराणने माघार घेतलेली नाही. या युद्धात आतापर्यंत इराणच्या शेकडो नागरिकांसह अनेक नेत्यांचा आणि लष्करी अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. तरीही इराण अमेरिका आणि इस्रायलवर जोरदार प्रतिहल्ले करत आहे.
अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील या युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणाव निर्माण झाला असून याचा फटका कच्च्या तेलाच्या व्यापाराला बसत आहे. कच्च्या तेलाच्या व्यापारामध्ये अडथळे निर्माण होत असून याचा फटका अनेक देशांना बसत आहे. यातच आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी देणारं एक वक्तव्य केलं. त्यामुळे इराणने संताप व्यक्त करत अमेरिकेला मोठा इशारा दिला आहे.
‘आम्ही अशा निराधार धमक्यांचा रणांगणावर सामना करतो’, असं इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे. एवढंच नाही तर अमेरिकेने इराणच्या सर्वात मोठ्या वीज प्रकल्पांवर हल्ला केला तर होर्मुझची सामुद्रधुनी इराण पूर्णपणे बंद करेल असाही इशारा आता इराणने दिला आहे.
इराणच्या अध्यक्षांनी काय म्हटलं?
अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर बोलताना आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या धमकीला प्रत्युत्तर देताना इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी म्हटलं की, “इराणला नकाशावरून पुसून टाकण्याचा भ्रम हा इतिहास घडवलेल्या राष्ट्राच्या विरुद्ध एका राष्ट्राची हताशा दर्शवते. अशा धमक्या आमची एकता अधिक दृढ करतात. होर्मुझची सामुद्रधुनी आमच्या भूभागाचं उल्लंघन करणाऱ्यांना वगळून सर्वांसाठी खुली आहे. आम्ही रणांगणावर या निराधार धमक्यांना खंबीरपणे तोंड देतो”, अशा शब्दांत इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला प्रत्युत्तर दिलं आहे.
The illusion of erasing Iran from the map shows desperation against the will of a history-making nation. Threats and terror only strengthen our unity. The Strait of Hormuz is open to all except those who violate our soil. We firmly confront delirious threats on the battlefield.
— Masoud Pezeshkian (@drpezeshkian) March 22, 2026
होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्याचा इराणचा इशारा
होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याच्या अनुषंगाने डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठा इशारा देत ४८ तासांत सामुद्रधुनी खुली करण्याची धमकी दिली होती. पण या धमकीमुळे इराणने संताप व्यक्त केला आणि त्यानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी अमेरिका आणि इस्रायल वगळता बाकी सर्वांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय घेतल्यानंतर काही तासांतच पुन्हा होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्याचा इशारा दिला.
“जर इराणचे वीज प्रकल्प उद्धवस्त करण्याच्या अमेरिकेने दिलेल्या धमक्यांची अंमलबजावणी झाली तर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केली जाईल आणि जोपर्यंत आमचे नष्ट झालेले वीज प्रकल्प पुन्हा बांधले जात नाहीत तोपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी सुरू केली जाणार नाही”, असा इशारा इराणच्या खतम अल-अंबिया या लष्करी कमांड युनिटने सरकारी टिव्हीवर प्रसारित केलेल्या एका निवेदनात दिला आहे.
“४८ तासांत होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा…”, ट्रम्प यांनी दिला होता इशारा
अमेरिका आणि इस्रायल युद्धामुळे जगभरात ऊर्जा पुरवणाऱ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या जलमार्ग म्हणजेच होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्येही मोठा तणाव आहे. त्यामुळे जागतिक व्यापार ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, ही होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठा इशारा दिला होता. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये ट्रम्प यांनी म्हटलं की, “जर हा जलमार्ग पुढच्या ४८ तासांत कोणत्याही धोक्याशिवाय पूर्णपणे खुला झाला नाही, तर अमेरिका इराणच्या सर्वात मोठ्या वीज प्रकल्पापासून सुरुवात करून विविध ऊर्जा प्रकल्पांना उद्ध्वस्त करेल.”
