US Israel-Iran Conflict President Masoud Pezeshkian terms for peace: मध्य पूर्वेत गेल्या १३ दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधातील लष्करी कारवाई लवकरच थांबवली जाईल, असे सूचक विधान केले असताना आता इराणच्या अध्यक्षांनी देखील शांतता चर्चेसाठी तयारी दर्शवली आहे. पण, इस्रायल आणि अमेरिकेविरुद्धचे युद्ध थांबविण्यासाठी इराणचे अध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्कियान यांनी दोन्ही देशांसमोर तीन अटी ठेवल्या आहेत.

इराणी अध्यक्षांची रशिया, पाकिस्तानबरोबर चर्चा

इराणचे अध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्कियान यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) शांतता चर्चेबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली. सुरु असलेल्या संघर्षावरुन रशिया आणि पाकिस्तानसोबत चर्चा झाल्याचे पेझेश्कियान यांनी नमूद करताना, हे युद्ध थांबविण्यासाठी इराणच्या अटी मान्य करणे हा एकमेव मार्ग असल्याचे स्पष्ट केले. 

इराणने इस्रायल आणि अमेरिकेसमोर ठेवलेल्या तीन मुख्य अटी कोणत्या आहेत?

१) इराणचे कायदेशीर अधिकार – आंतरराष्ट्रीय स्तरावर इराणच्या सार्वभौम हक्कांचा स्वीकार करणे.

२) नुकसानभरपाई – युद्धादरम्यान झालेल्या हानीसाठी योग्य ती आर्थिक किंवा राजनैतिक नुकसानभरपाई देणे.

३) भविष्यातील आक्रमणांविरुद्ध हमी: भविष्यात इराणवर कोणत्याही प्रकारचे आक्रमण होणार नाही, यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून ठोस सुरक्षा हमी देणे.

युद्ध जिंकल्याचा ट्रम्प यांचा दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी अमेरिकेने युद्ध केव्हाच जिंकले आहे, असा दावा केला. पण, लक्ष्य पूर्ण होत नाही तोपर्यंत अमेरिकन सैन्य तैनात असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला. याला इराणकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आला. आत्तापर्यंत या युद्धात १,२०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 

इंधन पुरवठ्यावर परिणाम

तेलवाहू जहाजांवर हल्ले आणि होर्मुझ सामुद्रधानी बंद केल्याने जगभरातील तेल पुरवठा विस्कळीत झाला असून, इंधनाचे दर वधारले आहेत. तेल तुटवडा निर्माण झाल्याने भारत रशियाकडून तेल आयात वाढली आहे. यासह गॅस तुटवडा देखील निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातही घरगुती आणि व्यावसायिक गॅसची तीव्र टंचाई भेडसावत आहे.