Ali Khamenei Funeral Tehran 3000 Deaths Fear: अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात २८ फेब्रुवारी रोजी इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर चार महिन्यांनी खामेनी यांचा अंत्यविधी पार पडत आहे. सहा दिवस चालणाऱ्या या अंत्यविधी सोहळ्यासाठी लाखो लोक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या सोहळ्यात जवळपास ३,००० इराणी नागरिकांचा मृत्यू होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात असल्यामुळे खळबळ उडाली आहे.
जर्मनीच्या वेल्ट वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, इराणकडून खामेनी यांच्या अंत्यविधीच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन केले जात आहे. तेहरानच्या एका अज्ञात पत्रकाराने सदर वृत्त वेल्टला दिले आहे. या वृत्तानुसार, इराणी रेड क्रेसेंट आणि राष्ट्रीय व्यवस्थापन संस्थेने प्रथम उपराष्ट्रपती मोहम्मद-रझा-आरिफ यांना एक पत्र लिहिले आहे. या गोपनीय पत्रात १,५०० ते ३,००० संभाव्य मृत्यूंचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
अंत्यविधीसाठी लाखोंची गर्दी उसळण्याची शक्यता असल्यामुळे मृत आणि बेपत्ता व्यक्तींची प्रकरणे हाताळण्यासाठी एक विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. तेहरान नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याने दिलेले माहितीनुसार, तेहरानच्या बेहेश्त-ए-झहरा येथील स्मशानभूमीत हजारो नवीन कबरी खोदण्यात आल्या आहेत.
या कर्मचाऱ्याने पुढे सांगितले की, या कबरी खरोखरच अस्तित्वात आहेत. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३,००० मृत्यूंची तयारी ठेवण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने येणारे लोक, तसेच प्रचंड उकाडा पाहता इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, तेहरानमधील ग्रँड मसल्ला येथे काचेच्या पेटीत खामेनी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले. त्यांनी अमेरिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आम्हाला सूड हवा आहे, आम्ही सूड घेऊ, आमच्या इमामाला ज्यांनी मारले, त्यांना आम्हीच मारू, अशा प्रकारच्या घोषणा यावेळी लोकांनी दिल्या.
WATCH: Thousands chant ‘Death to America’ at former Supreme Leader Khamenei’s funeral in Tehran, Iran pic.twitter.com/tvFfVBtdEL
— Rapid Report (@RapidReport2025) July 4, 2026
सुमारे दोन कोटी लोक उपस्थित राहण्याची शक्यता
शनिवारी (४ जुलै) तेहरानमधून सुरू झालेली अंत्यविधी पुढे इराणच्या इतर शहरांमधून पुढे जाऊन मशहदमध्ये संपेल. तर शेवटच्या दिवशी मशहद येथे त्यांना दफन केले जाईल. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंत्यविधीला सुमारे दोन कोटी लोक येण्याची शक्यता आहे. मात्र या आकड्याबाबत ठाम दावा कुणीही केलेला नाही.
अंत्यविधीचा वादग्रस्त इतिहास
अंत्यविधीबाबत इराणचा इतिहास वादग्रस्त राहिला आहे. २०२० मध्ये केरमान येथे इराणी रेव्होल्युशनरी गार्ड्सचे कमांडर कासिम सुलेमानी यांच्या अंत्यविधीदरम्यान ५६ लोक मृत्यूमुखी पडले होते. तर २०० हून अधिक जखमी झाले होते. १९८९ मध्ये रुहोल्ला खामेनी यांच्या अंत्यविधीवेळी हिंसाचार उसळला होता. ज्यात किमान आठ लोक ठार झाले होते, तर शेकडो लोक जखमी झाले होते.
