Iran Prolongs US War IRGC: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपेपर्यंत इराण जाणीवपूर्वक युद्ध लांबवू शकते, असा दावा इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे वरिष्ठ सल्लागार मोहम्मद रझा नक्वी यांनी केला आहे. अमेरिकेचे आर्थिक व लष्करी नुकसान करून भविष्यातील संभाव्य हल्ल्यांना आळा घालणे किंवा धाक निर्माण करणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश असल्याचे नक्वींनी स्पष्ट केले.
जाणीवपूर्वक युद्ध लांबविण्याचा उद्देश
रझा नक्वी यांनी ’पीबीएस न्यूजआवर’ या वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली आहे. “या युद्धाचा कालावधी अमेरिकेच्या पुढील अध्यक्षीय निवडणुकीपर्यंत वाढवणे आणि त्यांच्या संसाधनांचे नुकसान करणे हा एक मार्ग आहे. यामुळे यापुढे इराणवर हल्ला करू इच्छिणाऱ्या कोणत्याही देशाला याची मोठी किंमत मोजावी लागेल, याची जाणीव होईल,” असे नक्वी म्हणाले. सध्या युद्धात इराण आघाडीवर आहे, मात्र अद्याप अंतिम ध्येय साध्य झालेले नाही, असे प्रतिपादन नक्वी यांनी केले.
इराणमध्ये क्षेपणास्त्रांचे उत्पादन सुरूच
“युद्ध प्रदीर्घ काळ चालल्यास इराणला अमेरिकेविरोधात लढण्याचा अधिक अनुभव मिळेल आणि यामुळे अमेरिकेला मोठा आर्थिक व लष्करी फटका बसेल”, असा विश्वास नक्वी यांनी व्यक्त केला. या मुलाखतीदरम्यान नक्वी यांनी इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेबद्दलही भाष्य केले. “इराण रोज जेवढ्या क्षेपणास्त्रांचा वापर करत आहे, त्याहून अधिक क्षेपणास्त्रांचे उत्पादन देशात सुरू आहे. युद्ध वर्षानुवर्षे चालले तरी इराण वेगवेगळ्या ठिकाणांहून क्षेपणास्त्र निर्मिती आणि हल्ले सुरू ठेवू शकतो”, असे नक्वी म्हणाले.
अमेरिकेचे आर्थिक हितसंबंध उद्ध्वस्त करण्याचा इशारा
क्षेपणास्त्रांचा साठा संपला तरी इराण धोकादायक ठरू शकतो, असा सूचक इशारा त्यांनी दिला. “जगात सर्वत्र अमेरिकेचे अनेक आर्थिक हितसंबंध आहेत आणि ते सर्व सहज उद्ध्वस्त केले जाऊ शकतात,” असे स्पष्टीकरण नक्वींनी या इशाऱ्याबाबत दिले. दरम्यान, कोणत्या विशिष्ट आर्थिक घटकांना लक्ष्य केले जाईल? किंवा हे हल्ले कसे केले जातील? याचा सविस्तर खुलासा केला नाही.
