Ayatollah Ali Khamenei on Donald Trump: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या विरोधात इराणमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. इराणमध्ये महागाईने आजपर्यंतचा सर्वोच्च बिंदू गाठला आहे. त्यामुळे लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. काल (गुरूवारी ८ जानेवारी) रात्री इराणमध्ये सर्वत्र इंटरनेट ब्लॅकआउट करण्यात आले. त्यामुळे लोकांचा एकमेकांशी संपर्क तुटला. आता खामेनी यांनी इराणमधील जनतेला संबोधित केले आहे. काही आंदोलकांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मदत हवी आहे, पण त्यांचे हात एक हजारहून अधिक इराणी नागरिकांच्या रक्ताने माखलेले आहेत, असे खामेनी म्हणाले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सत्तेवरून पायउतार होण्याची वेळ येईल, इराणला अस्थिर करण्यासाठी बाहेरील देशांचा पाठिंबा घेतला जातोय, असे खामेनी म्हणाले. इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात आतापर्यंत ४० हून अधिक आंदोलकांचा मृत्यू झाला आहे.
खामेनी म्हणाले, “काही आंदोलक डोनाल्ड ट्रम्प यांना मदत मागत आहेत. पण, त्यांना माहिती असायला हवं की फारोह, निमरोध, रझा शाह आणि मोहम्मद रझा हे क्रूर शासक कधीकाळी सर्वोच्च पदावर होते. पण त्यांच्या अहंकारामुळे त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं. त्यांनाही सत्तेवरून खाली खेचलं जाईल.” खामेनी यांनी इराण सरकारच्या माध्यमावरून जनतेला संबोधित केले.
“ट्रम्प यांचे हात १००० हून अधिक इराणी नागरिकांच्या रक्ताने माखलेले”
खामेनी पुढे म्हणाले, “इस्लामिक रिपब्लिक लाखो लोकांचे बलिदानाने आपल्याला मिळाले आहे. ते आता विध्वंस घडवून आणणाऱ्यांच्या हातात आपण सोपवू शकत नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे हात १००० हून अधिक इराणी नागरिकांच्या रक्ताने माखलेले आहेत.” जून २०२५ मध्ये अमेरिकेने इराणमधील अणुतळांवर हल्ला केला होता. त्या पार्श्वभूमीवर खामेनी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ही टीका केली आहे. ते म्हणाले, “इराणच्या तरूणांना माझे आवाहन आहे की एकत्र या आणि तयार राहा. देश एकजूट असेल तर कोणताही शत्रू आपला पराभव करू शकणार नाही.”
खामेनी कुठे आहेत ?
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी हे अज्ञात स्थळी आहेत. ते सध्या कुठे आहेत याबाबत गुप्तता बाळगण्यात आली आहे. काही वृत्तांनुसार, खामेनी हे रशियात पळून जाण्याच्या तयारीत आहेत. कुटुंबातील व जवळच्या २०-२५ जणांना घेऊन खामेनी इराण सोडू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. इराणमध्ये आंदोलनादरम्यान निष्पाप नागरिकांचा बळी गेला तर अमेरिका मध्यस्थी करेल, अशी धमकी खामेनी यांना अमेरिकेने दिली आहे. ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, “ते त्यांच्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहे. हे खूप वाईट ठरू शकतं.” असा इशारा ट्रम्प यांनी खामेनी यांना दिला होता.
