इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या विरोधात इराणमध्ये आंदोलन सुरू आहे. इराणमधील नागरिकांना महागाईच्या झळा बसत आहेत. त्यामुळे जनता रस्त्यावर उतरून खामेनी यांच्या विरोधात आंदोलन करत आहे. अमेरिकेने लादलेले निर्बंध व इस्रायलविरूद्ध चाललेला संघर्ष यांमुळे इराणमध्ये डिसेंबर महिन्यात महागाई ४२ टक्क्यांनी वाढली. निष्पाप आंदोलकांवर इराणमधील खामेनी यांच्या सरकारने हल्ला केल्यास अमेरिका हस्तक्षेप करेल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. आता एका अहवालानुसार इराणमध्ये आंदोलन सुरू झाल्यापासून ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर ट्रम्प यांनी इराणवर सैन्य कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊ.

मानवी हक्कांशी संबंधित अमेरिकेतील HRANA (Human Rights Activists News Agency) या संस्थेने इराणमधील आंदोलनावर एक अहवाल प्रकाशित केला आहे. इराणमध्ये मागील दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनात ४९० आंदोलकांचा तर ४८ सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला असून १०,६०० आंदोलकांना अटक झाल्याचे अहवालात म्हटले आहे. दरम्यान, आंदोलनात किती जणांचा मृत्यू झाला याबाबत इराणने आकडेवारी जाहीर केलेली नाही. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणमध्ये सैन्य कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसेच इराण अमेरिकेबरोबर चर्चेस तयार असल्याचे ट्रम्प म्हणाले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “इराणने आता मर्यादेचे उल्लंघन केल्याचे दिसत आहे. काही लोकांचा मृत्यू व्हायला नको होता, परंतु, त्यांच्या मृत्यू झाला आहे. इराणमध्ये नेते म्हणवणारे खरंच नेते आहेत की हिंसा करून राज्य चालवतात याबाबत मला शंका आहे. पण, आम्ही आणि आमचे सैन्य या सगळ्या गोष्टींकडे बारीक लक्ष ठेवून आहोत. आम्ही इराणबाबत काही ठोस पर्यायांचा वापर करण्याचा विचार करत आहोत” दरम्यान, इराण अमेरिकेबरोबर वाटाघाटी करण्यास तयार असल्याचे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी काल रविवारी याबाबत पत्रकारांना माहिती दिली. लवकरच इराणबरोबर एक बैठक आयोजित केली जाणार असल्याचे ट्रम्प म्हणाले.

रझा पहलवी यांचे इराणच्या सुरक्षा दलाला आवाहन

इराणचे शेवटचे शाह मोहम्मद रझा पहलवी यांचे पुत्र रझा पहलवी यांनी इराणमधील सुरक्षा दलांना आवाहन केले आहे. रझा पहलवी यांनी खामेनी यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच आंदोलकांकडून रझा पहलवी यांच्या समर्थनात नारे दिले जात आहेत. रझा पहलवी म्हणाले, “इराणमधील सरकारी कर्मचारी तसेच सुरक्षा दलाच्या जवानांना मी आवाहन करतो की, तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. एक तर तुम्ही इराणमधील नागरिकांच्या पाठीशी उभे राहून आंदोलनात सहभागी व्हा किंवा इराणच्या नागरिकांची हत्या करणाऱ्या इराणी नेतृत्वाबरोबर (अयातुल्ला अली खामेनी उभे राहा.” दरम्यान, अमेरिकेतील संस्थेने अहवाल प्रकाशित केल्यानंतर जर्मनी तसेच अमेरिकेत खामेनी यांच्याविरोधात काही ठिकाणी आंदोलन करण्यात आले.