दुबई, वॉशिंग्टन : मध्यस्त देशांनी आणलेला शस्त्रसंधी प्रस्ताव इराणने फेटाळला आहे. अमेरिकेशी थेट चर्चा करणार नसल्याचे स्पष्ट करतानाच, युद्ध समाप्तीसाठी आग्रही असल्याचे त्यांनी नमूद केले. तर होर्मुज सामुद्रधुनी तात्पुरती खुली करण्याची मागणीही फेटाळून लावली आहे. याबाबत पाकिस्तानकडे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
इस्रायल आणि अमेरिकेने सोमवारी इराणवर केलेल्या हल्ल्यांत २५ हून अधिक जण ठार झाले. युद्ध तात्काळ थांबावे, यासाठी शांततेचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इजिप्त, पाकिस्तान आणि तुर्कीच्या मध्यस्थीने हा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार शस्त्रसंधी तत्काळ लागू करून १५ ते २० दिवसांत वाटाघाटी पूर्णत्वास नेण्याचे नियोजन आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसीम मुनिर हे अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स, विशेष दूत स्टीव विटकॉफ, इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांच्या सतत संपर्कात होते.
इराणने शस्त्रसंधीबाबतच्या प्रस्तावांना आपल्या मागण्या मध्यस्थांकरवी कळविल्या असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. धमकी आणि मुदत देण्याच्या वक्तव्यांमध्ये वाटाघाटी शक्य नाहीत, असे प्रवक्ते इस्माईल बघेई यांनी स्पष्ट केले.
गुप्तचर खात्याचे प्रमुख खादेमी ठार
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर सोमवारी जोरदार हल्ले केले. ‘साऊथ पार्स’ नैसर्गिक वायू क्षेत्रालाही लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांत २५हून अधिक जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड’चे गुप्तचर खात्याचे प्रमुख मेजर जनरल माजिद खादेमी यांचा समावेश आहे. इराणनेही इस्रायलवर आणि शेजारी अरब देशांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. इराणवरील हवाई हल्ल्यात गुप्तचर खात्याचे प्रमुख मेजर जनरल माजिद खादेमी ठार झाल्याची माहिती इस्रायलच्या हवाई दलाने दिली. इस्रायलने शहरातील शरीफ तंत्रज्ञान विद्यापीठातील डेटा सेंटरलाही लक्ष्य केले. साऊथ पार्स हे क्षेत्र इराण आणि कतार या दोन्ही देशांमध्ये आहे.
इराणच्या क्षेपणास्त्रांनी इस्रायलच्या हायफा शहराला लक्ष्य केले. या ठिकाणी चार जणांचा मृत्यू झाला. शेजारी आखाती देशांवरही इराणने हल्ले केले.
‘होर्मुझ’मधून भारताच्या दोन नौका मार्गस्थ
* नवी दिल्ली : भारताचे ‘ग्रीन आशा’ हे ‘एलपीजी’ घेऊन येणारे जहाज होर्मुझ सामुद्रधुनीतून मार्गस्थ झाली आहे. सूत्रांनी ही माहिती दिली.
* अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर या मार्गे मार्गस्थ झालेली भारताची ही आठवी नौका आहे. ‘ग्रीन सान्वी’ ही नौका शुक्रवारी या ठिकाणाहून मार्गस्थ झाली. ’‘ग्रीन सान्वी’ ही नौका ४६,६५० टन एलपीजी घेऊन ७ एप्रिल रोजी, तर ‘ग्रीन आशा’ १५,५०० टन माल घेऊन ९ एप्रिल रोजी भारतात येणे नियोजित आहे, असे बंदर मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मुकेश मंगल यांनी सांगितले.
