Iran Rejects Donald Trump negotiation claims : इराणने २८ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेसोबत कोणतीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष चर्चा केल्याचा दावा ठामपणे फेटाळून लावला आहे. याउलट, वॉशिंग्टनकडून वारंवार असे विधान केले जात होते की ही चर्चा “अतिशय उत्तम” रितीने पुढे सरकत आहे.

मंगळवारी इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, ३१ दिवसांच्या या संघर्षादरम्यान अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. प्रवक्ते इस्माईल बका़ई यांनी स्पष्ट केले की, वॉशिंग्टनने केवळ चर्चेसाठी विनंती केली होती आणि पाकिस्तानसह इतर मध्यस्थांमार्फत काही प्रस्ताव पाठवले होते.

इराणने नेमकं काय म्हटलंय?

“या ३१ दिवसांत आमची अमेरिकेशी कोणतीही चर्चा झालेली नाही. प्रत्यक्षात फक्त चर्चेची एक विनंती आणि अमेरिकेचे काही प्रस्ताव पाकिस्तानसह ठराविक मध्यस्थांमार्फत आमच्यापर्यंत पोहोचले आहेत,” असं इस्माइल बाकई यांनी ‘X’ वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांनी पुढे नमूद केले की, लष्करी कारवाया सुरू असताना इराण पूर्णपणे स्वतःच्या संरक्षणावर लक्ष केंद्रित करून आहे. जुन्या राजनैतिक ‘विश्वासघातांच्या’ आठवणींमुळे इराणने सावध पवित्रा घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

“आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. अमेरिकेचे लष्करी आक्रमण आणि घुसखोरी पूर्ण तीव्रतेने सुरू असताना, आमचे सर्व प्रयत्न आणि क्षमता इराणच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी समर्पित आहेत. “आम्ही जुने अनुभव आमच्या मांस, त्वचा आणि हाडांनी अनुभवले आहेत आणि एका वर्षापेक्षा कमी कालावधीत मुत्सद्देगिरीचा (diplomacy) दोनदा जो विश्वासघात झाला, तो आम्ही विसरलेलो नाही,” असे ते म्हणाले.

हे विधान व्हाईट हाऊसच्या विधानांच्या थेट विरोधात आहे, जिथे प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी म्हटले होते की इराणसोबतची चर्चा “सुरू असून चांगली प्रगती करत आहे”. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही वारंवार दावा केला आहे की समझोता लवकरच होऊ शकतो आणि थेट तसेच अप्रत्यक्ष माध्यमांतून इराणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क सुरू आहे.

ट्रम्प यांनी असेही संकेत दिले की वॉशिंग्टनने मोहम्मद बाघर गालीबाफ यांच्याशी संभाव्य मध्यस्थ म्हणून संपर्क साधला आहे आणि ते काम करण्यासाठी योग्य व्यक्ती आहेत का, याचा अंदाज अमेरिका एका आठवड्यात घेणार आहे. या परस्परविरोधी दाव्यांमुळे तेहरान आणि वॉशिंग्टन यांच्यातील वाढती दरी स्पष्ट होत आहे, तर दुसरीकडे पडद्यामागून होणाऱ्या संपर्कावरही बारीक लक्ष ठेवले जात आहे.

युद्ध समाप्तीचे कोणतेही संकेत नाहीत?

२८ फेब्रुवारी रोजी ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ (Operation Epic Fury) अंतर्गत सुरू झालेले इराण-अमेरिका-इस्रायल युद्ध आता दुसऱ्या महिन्यात शिरले असून, तणाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर सुरू झालेला हा संघर्ष संपूर्ण प्रदेशात तीव्र होत आहे.

युद्ध संपवण्याचे प्रयत्न आतापर्यंत अपयशी ठरले आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी १५ कलमी शांतता आराखडा मांडला होता, जो इराणने फेटाळून लावला. त्याऐवजी इराणने पाच अटी ठेवल्या आहेत, ज्यामध्ये युद्धाची भरपाई, निर्बंध हटवणे आणि हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणच्या सार्वभौमत्वाला मान्यता देणे यांचा समावेश आहे.